News Flash

साहित्य संमेलन स्थगित

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मराठी साहित्य महामंडळाचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

मराठी साहित्य विश्वातील सर्वात मोठा ‘साहित्य मेळा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, ते नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला. साहित्य संमेलन येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान नाशिक येथे होणार होते.

करोनाचा राज्यभरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी रविवारी औरंगाबाद येथे सांगितले.

साहित्य संमेलनाध्यक्ष, निमंत्रित यांच्याबाबत कोणताही बदल केला जाणार नाही. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नाशिक येथील आयोजक मंडळाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.  संमेलन मे महिन्याच्या आधी घ्यावे अशी महामंडळाची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या निधी संकलनाला वेग आला असताना आता करोना संसर्ग वाढत असल्याचे आढळले. त्यामुळे चारही साहित्य मंहामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच स्वागताध्यक्ष आणि निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.

संमेलनात पुस्तक प्रदर्शनासाठी गाळेभाडे म्हणून भरलेली रक्कम पुस्तक विक्रेते आणि प्रकाशकांना हवी असल्यास त्यांना ती परत घेण्याची मुभा आहे, असेही ठाले पाटील यांनी सांगितले. संमेलनाच्या अन्य कोणत्याही बाबींमध्ये बदल झाला नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

करोना परिस्थितीमुळे यंदा साहित्य संमेलन न घेण्याचीच साहित्य महामंडळाची मानसिकता होती. मात्र नोव्हेंबरनंतर करोना रुग्णसंख्या घटू लागताच नाशिक येथे संमेलन घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला होता. गेल्या वर्षी उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन पार पडेपर्यंत राजकारणी व्यक्तींचा वावर संमेलनाच्या व्यासपीठावर होऊ नये, अशी दक्षता घेणाऱ्या साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षी छगन भुजबळ यांच्याकडे स्वागताध्यक्षपद दिले.

* करोना विषाणूच्या साथीमुळे यंदा साहित्य संमेलन न घेण्याची साहित्य महामंडळाची सुरुवातील भूमिका होती.

* परंतु गेल्या नोव्हेंबरमध्ये साथीचा प्रभाव कमी होताच नाशिक येथे संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. निधी संकलनापासून सर्व तयारीही सुरू झाली होती.

* करोना साथीने पुन्हा उचल खाल्ल्याने साहित्य संमेलन पार पडणार की स्थगित होणार, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. आता ते स्थगित करण्यात आले आहे.

आयोजन कधी?

स्थगित केलेले साहित्य संमेलन मे महिन्याआधी व्हावे, अशी महामंडळाची इच्छा आहे. त्यामुळे करोना साथीचा फैलाव कमी झाल्यानंतर नाशिक येथील आयोजक मंडळाशी चर्चा करून त्याच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या करोना वाढतो आहे. अशा वेळी मोठय़ा संख्येत लोकांनी एकत्र येणे योग्य होणार नसल्याने संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला. परिस्थिती सुधारल्यानंतर नव्या तारखा निश्चित करण्यात येतील, असे महामंडळाने कळवले आहे. आम्ही या निर्णयाशी सहमत आहोत.

– डॉ. जयंत नारळीकर, नियोजित अध्यक्ष

करोनामुळे साहित्य संमेलन लांबणीवर टाकणे सर्वार्थाने योग्य होते. त्यानुसार संबंधित सर्वाशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. संमेलनासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला आहे. निधीबाबत कोणताही तांत्रिक मुद्दा निर्माण होणार नाही. संमेलनाचे निम्म्याहून अधिक नियोजन झाले आहे. त्यामुळे केवळ १५ दिवस मिळाले तरी संमेलनाची संपूर्ण तयारी केली जाईल. – छगन भुजबळ, नियोजित स्वागताध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 12:20 am

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan postponed abn 97
Next Stories
1 शाळा बंद असताना शाळाबाह्य़ विद्यार्थी सर्वेक्षण
2 नगरमधील चार बालिकांचा औरंगाबादमध्ये केला जाणार होता बालविवाह; ‘अंनिस’ने रोखले
3 अभियांत्रिकी.. विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत
Just Now!
X