लातूर शहराला नेमका कुठून पाणीपुरवठा करणार हे प्रशासन निश्चित सांगायला तयार नाही. या पाश्र्वभूमीवर लातूरकर पाणीप्रश्नी चांगलेच हवालदिल झाले असताना विविध राजकीय पक्षांसह अनेकांनी आता या बाबत रस्त्यावरून उतरून संघर्ष करण्याचा इशारा दिला. ‘कधी भंडारवाडी, कधी उजनी, कधी मसलगा तर कधी माकणी, दीनवाण्या लातूरकरांना नेमके केव्हा मिळणार पाणी?’ हे वृत्त गुरुवारी ‘लोकसत्ता’मध्ये ठळक स्वरुपात प्रसिद्ध होताच शहरातील विविध पक्ष-संघटनांनी पाणीप्रश्नी पुढे सरसावत तीव्र भावना व्यक्त केल्या.
शहरात बीएसएनएलची ‘थ्री’जी सेवा सुरू होण्यापूर्वी पाणीप्रश्नी ‘थ्री’जीने संघर्ष उभा करीत खासगीकरणांच्या विरोधात लढा दिला. अशोक गोिवदपूरकर, मनोहरराव गोमारे व उदय गवारे या तिघांना ‘थ्री’जी उपमा मिळाली होती. लातूर शहर पाणीपुरवठा खासगीकरण विरोधी संघर्ष समिती या नावाने ती कार्यरत होती. या संघर्ष समितीतील सदस्यही आता नव्याने पाणीप्रश्नी आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत.
गोिवदपूरकर यांनी राजकीय मंडळींनी लातूरकरांना पाण्यासाठी दाही दिशा फिरवण्याचे ठरवले आहे काय, असा प्रश्न उपस्थित करून प्रारंभी पूर्वेकडील मन्याड, त्यानंतर उत्तरेकडील भंडारवाडी, नंतर पश्चिमेकडील उजनी व आता नव्याने दक्षिणेकडील माकणीकडून पाणी आणू, असे सांगितले जात आहे. प्रशासन पाणी प्रश्नावर गंभीर नाही. निसर्गाने साथ दिली नाही, तर लातूर शहरात मार्चमध्येच पाण्यासाठी मारामारी करण्याची वेळ येईल. संघर्ष समिती नव्याने या प्रश्नावर आंदोलन करण्याची तयारी करीत असल्याचे सांगितले.
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी सरकारवर या प्रश्नी गंभीर आरोप केले. महापालिकेची निवडणूक समोर ठेवून सरकार पाणीप्रश्नाचे राजकारण करीत आहे. लातूरकरांना पाणी देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. गेल्या वर्षभरापासून महापौर, आमदारांनी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांना भेटून पाणी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही. लातूरच्या पाणी प्रश्नाचे राजकारण केले जात असेल व सूडबुद्धीने कोणी वागणार असेल तर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून पाण्यासाठी आंदोलन करेल, असा इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी, महापालिकेचे प्रशासन, खासदार, शहर व ग्रामीणचे आमदार, जि. प. अध्यक्षा हे सर्वच पाणी प्रश्नावर गंभीर नाहीत. एव्हाना लातूर शहराला नेमके कुठून पाणी द्यायचे हा प्रश्न मार्गी लागून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला हवी होती. मुख्यमंत्र्यांनी उजनीहून लातूरकरांना पाणी दिले जाईल, तसा प्रस्ताव पाठवा असे उस्मानाबादच्या बठकीत सांगितले होते. महिना उलटून गेल्यानंतरही अजून प्रस्तावाचीच भाषा असेल तर लोकप्रतिनिधी व प्रशासकीय मंडळी या प्रश्नावर गंभीर नाहीत असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या गळी हे गांभीर्य उतरवेल व त्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल, असे स्पष्ट केले.
शिवसेनेचे अॅड. बळवंत जाधव यांनी पाणीप्रश्नावर सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता सर्वचजण गंभीर नसल्याचे म्हटले आहे. मांजरा धरणाची निर्मिती शेतीला पाणी देण्यासाठी करण्यात आली. शेकडो शेतकऱ्यांची जमीन देऊन हे धरण बांधले गेले. लातूरकरांना मिळणारे पाणी हे खरे शेतकऱ्यांचे आहे. आपल्याला मिळणारे पाणी योग्य वापरले पाहिजे याची जाणीव लोकांना नाही. प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाते. पाण्यासाठी मीटर बसवले पाहिजे व त्याद्वारेच पाणी दिले पाहिजे ही आपली भूमिका आहे. महापालिका पाण्याचे नियोजन नीट करीत नाही. लातूरकरांना पाण्याचा कायमचा स्रोत उपलब्ध करण्यात येथील नेतृत्वाचा कमकुवतपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या उपलब्ध असणाऱ्या पाण्याचाच योग्य विनियोग केला तर लातूरकरांना पाणी कमी पडणार नाही. आधी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सरकार लातूरकरांच्या पाणी प्रश्नावर पोरखेळ करणार असेल तर सत्तेत असलो तरी लातूरकरांसाठी रस्त्यावर उतरू. सरकारला व लोकप्रतिनिधीला या प्रश्नावर लक्ष घालण्यास भाग पाडू. पालकमंत्री पंकजा मुंडे व आमदार अमित देशमुख यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
उजनीचेच पाणी लातूरकरांना मिळेल – लाहोटी
लातूर पाणीप्रश्नी सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादहून उजनीचे पाणी लातूर शहराला उन्हाळय़ात उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले होते. माकणी धरणातून पाणी उपलब्ध करण्याचा नवा पर्याय समोर आला आहे. गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटू व लातूरकरांना उजनीचे पाणी उपलब्ध करून देऊ. सरकार लातूरकरांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया लातूर शहर भाजप जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी व्यक्त केली.