नाशिक-नगर व मराठवाडय़ात पाण्यासाठी प्रादेशिक वाद लावून देण्यात आला. त्या मागे काही ठराविक नेते बदनाम व्हावेत, असे राजकारण होते. कृष्णेचे पाणी आणण्यातच बहुतांश वेळ गेला. परिणामी गोदावरीचे खोरे तुटीचे राहिले. त्यास तेव्हा सरकारमध्ये असणारे आम्ही दोन्ही पक्ष जबाबदार आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी औरंगाबाद येथे मांडली. बाळासाहेब विखे पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता पुन्हा टीका केली.
प्रादेशिक वाद पोसताना काही ठराविक नेते बदनाम व्हावेत, असे प्रयत्न केले गेले. खरे तर पश्चिमेतील वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यातही वळवून आणता आले असते. तसे सव्रेक्षण जरी झाले असते तरी एक पाऊल पुढे टाकल्यासारखे घडले असते. मात्र, तसे घडले नाही. आता मराठवाडा आणि नगर-नाशिक आहेत त्याच पाण्यात भांडत आहेत. वरून सोडायचे आणि खाली आडवायचे, असा कारभार सुरू आहे. त्या पेक्षा अधिकचे पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता होती. खरे तर पाणी वाटपाच्या अनुषंगाने बाळासाहेब विखे पाटील यांनी एक जलआराखडा बनविला होता. त्याकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले. केवळ तो आराखडा बाळासाहेब विखेंनी बनविला म्हणून त्याकडे लक्ष दिले गेले नाही, असा आरोप करत त्यांनी बाळासाहेब विखेंच्या भूमिकेचे समर्थन केले. मात्र, मराठवाडय़ातील दुष्काळास शरद पवारच जबाबदार आहेत, असा बाळासाहेबांनी केलेल्या थेट आरोपावर बोलण्याचे त्यांनी टाळले. मात्र, त्यांच्या सर्व मतांना दुजारा देणारी भूमिका त्यांनी मांडली. ते कोणत्या संदर्भाने बोलले, हे सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी थेट आरोपावर बोलणे टाळले. मात्र, गोदावरीतील तुटीस आघाडी सरकारमधील दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचे त्यांनी मान्य केले.
 बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीच्याच बाजूचे !
ते नदीवरचे आहेत आणि आम्ही कालव्यावरचे आहोत. त्यामुळे त्यांनी पाण्याच्या संदर्भात घेतलेल्या उडीवर जाताजाता बोलताना राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेबांना राष्ट्रवादीच्या बाजूचे असल्याचा टोला मारला. ते नेहमीच पवारांच्या बाजूने असतात, असे सांगत त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. नुकतेच थोरात यांनी निळवंडे व भंडारदरा धरणातून पाण्याची उधळपट्टी होत आहे. दुसरीकडे सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावर निर्माण झालेल्या वादात राधाकृष्ण विखेंनी थोरांतांना सतत राष्ट्रवादीच्या बाजूचे ठरविले.