24 October 2019

News Flash

जलदूत राजेंद्रसिंह यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार

भारताचे जलदूत म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा राजस्थानातील राजेंद्रसिंह यांना या वर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे.

भारताचे जलदूत म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा राजस्थानातील राजेंद्रसिंह यांना या वर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता तापडिया नाटय़मंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे अनंत भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मुळे व सचिव सविता पानट यांनी गुरुवारी सांगितले. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे जलनियोजन व लोकनीतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुष्काळ व त्याच्या निवारणाचे मार्ग हा अनंत भालेराव यांच्या नित्य चिंतनाचा व आस्थेचा विषय होता. ‘मराठवाडा’चे संपादक म्हणून ते या विषयावर सातत्याने लिखाण करत. त्यामुळे यंदाचा पुरस्कार राजेंद्रसिंह यांना देणे महत्त्वाचे वाटल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे. थारच्या वाळवंटापलीकडे अल्प पावसाच्या प्रदेशात नंदनवन फुलविणारे भगीरथ असे राजेंद्रसिंह यांचे यथार्थ वर्णन केले जाते. कालौघात नष्ट झालेले जलसंवर्धनाच्या साधनांचे पुनरुज्जीवन म्हणजे ‘जोहड’ अर्थात मातीने बांधलेले छोटे बंधारे होत. पुरस्कारानंतर त्यांचे याच विषयावर म्हणजे ‘स्थानिक जलस्रोतों का पुनर्निमाण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यांच्या कार्यामुळे अरावलीच्या पहाडामधून बांधलेल्या ४०० बंधाऱ्यांनी कमाल केली आणि अरवरी ही नदी पुनरुज्जीवित झाली. त्यामुळेच हा पुरस्कार देण्याचे ठरविले असल्याचे पानट यांनी सांगितले.

First Published on October 9, 2015 1:10 am

Web Title: anant bhalerao award to rajendrasinh