News Flash

रामदास कदम यांनी माझ्या पराभवासाठी प्रयत्न केले !

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा गौप्यस्फोट

गेल्या लोकसभा निवडणुकीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आपल्या पराभवासाठी पक्षविरोधी काम केले होते, असा गौप्यस्फोट केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केला. मात्र काही दिवसाने आपल्याकडे येऊन दिलगिरी व्यक्त केली व मुलाला विधानसभेत निवडून आणण्याकरिता मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर ‘तुम्ही जरी मला राजकीय आयुष्यातून उठविण्यासाठी प्रयत्न केले असले तरी मी मात्र तुमच्या मुलाला आमदार करेन असा शब्द देतो असे त्यांनी सांगितले. शिवसैनिक कसा असतो हे सांगण्यासाठी गीते यांनी दिलेल्या या उदाहरणामुळे रामदास कदम पक्षविरोधी काम करत होते हे शिवसेनेच्या नेत्यानेच उघड केले.

औरंगाबादचे माजी पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद उघड होता. हा वाद विकोपाला जाऊ लागल्यानेच अखेर रामदासभाईंना औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून दूर करण्यात आले. शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनी गीते यांना निमंत्रित करून खैरे यांनी रामदासभाईंच्या विरोधातील जुने हिशेबच चुकते केले.  गीते यांना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी बोलाविणे आणि त्यांच्या तोंडून पर्यावरणमंत्र्यांचा जुना किस्सा सांगितला गेल्याने औरंगाबादमधील कदम समर्थकांना कानटोचणी मिळाली. वादावर पडदा पडलेला हा किस्सा अनंत गीते जेव्हा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आवर्जून सांगत होते, तेव्हा स्थानिक पातळीवरील राजी-नाराजी व्यक्त करणाऱ्या घटनाही ठळकपणे समोर आल्या. वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमासाठी सुरुवातीलाच महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर निमंत्रित केले. मात्र, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट व्यासपीठावर आले नाहीत. ते येत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर खासदार खैरे यांनी सूत्रसंचालन करणाऱ्या जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडून ध्वनीक्षेपक हातात घेतला. आमदार शिरसाट यांना पुन्हा एकदा व्यासपीठावर आमंत्रित केले. पण तरीही ते खुर्चीतून हलले नाही. शेवटी त्यांचा सत्कारदेखील व्यासपीठाच्या खाली जाऊन एका शिवसैनिकाने केला. कोकणामधील गीते आणि कदम यांच्यातील वाद मराठवाडय़ातील शिवसैनिकांना आवर्जून सांगताना याच कार्यक्रमात आमदार शिरसाट यांचे व्यासपीठावर न जाणेदेखील शिवसैनिकांना भुवया उंचवायला लावणारे होते. या अनुषंगाने नंतर खासदार खैरे यांना विचारले असता ते हसून म्हणाले, ‘विजय होईपर्यंत व्यासपीठावर न चढण्याचा त्यांचा पण असावा.’

शिवसैनिक कसा असावा असे वर्धापनदिनानिमित्त सांगणाऱ्या अनंत गीते यांनी स्वत:चेच उदाहरण देत आहे. त्याचे दुसरे कोणतेही अर्थ काढू नका, असे म्हणत तटकरे आणि जयंत पाटील यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढताना कसा त्रास झाला, याचे वर्णन केले. ‘मी म्हणायचो, मी दोन लाख मतांनी निवडून येईल. तेव्हा पत्रकारही एवढी मते कशी मिळतील, असा प्रश्न करायचे. गेल्या निवडणुकीत मी केवळ २१०० मतांनी निवडून आलो. तेव्हा मला प्रतिक्रिया विचारली गेली. मी बोलण्याआधीच पाठीमागचा शिवसैनिक म्हणाला, ‘त्यांच्या २०० कोटींचा चुराडा झाला.’. तटकरे यांनी गेल्या निवडणुकीत वारेमाप पैशांचा वापर केला होता, असे सांगत पैशांच्या विरोधातही शिवसैनिक उभा राहतो, असे गीते म्हणाले. ‘शेकापचे जयंत पाटील आणि तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असताना रामदासभाईंनी मला पराभूत करण्यासाठी सर्वकाही केले. तेव्हा मी स्वकीयांच्या विरोधातही लढलो’, असे सांगत त्यांनी कदम यांना कसे माफ केले आणि त्यांच्या मुलाला आमदार करण्याचा शब्द कसा दिला, हे आवर्जून सांगितले.

औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्या रामदास कदम यांनी खासदार खैरे यांच्यावर नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांचा खासा चमू औरंगाबादमध्ये जमवला होता. कदम आणि खैरे यांच्यातील कुरघोडय़ा औरंगाबादच्या राजकारणाचा अविभाज्य भाग वाटावा, अशी स्थिती झाली होती. त्यानंतर कदम यांना बदलण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:05 am

Web Title: anant geete ramdas kadam
Next Stories
1 सर्वोपचार रुग्णालयच ‘कुपोषित’
2 मराठवाडा विकासाचा मानबिंदू कचरा, दुर्गंधीच्या विळख्यात
3 रेनकोटच्या ‘जीएसटी’त भेद!
Just Now!
X