औरंगाबाद :  ग्रामीण भागातील महिला, मुलींचे स्वतच्या आरोग्यविषयक समस्यांकडे कमालीचे दुर्लक्ष होत असून त्यांच्यामध्ये अ‍ॅनिमियाचे (रक्तक्षय) प्रमाण साधारण ४० टक्क्य़ांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात पैठण रोडवरील लाखे गावातील महिलांचे उदाहरण समोर ठेवण्यात आले आहे. लाखे गावातील महिला, मुलींमध्ये हेच प्रमाण ४१ टक्क्य़ांवर आढळून आले आहे. लाखे गाव हे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने  युनिसेफचे अर्थसाहाय्य व एम.सी.ए.आर. पुणे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पोषणमूल्य आधारित शेती पद्धती प्रकल्पांतर्गत दत्तक घेण्यात आले आहे. या प्रकल्पाची सुरुवात लाखे गावात करण्यात आली आहे.

याबाबत कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाडगावकर यांनी सांगितले,की या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात पोषण दर्जा वाढविण्याकरिता शेती पद्धतीमध्ये बदल करायचे आहेत. यासाठी ११० शेतकरी कुटुंबांना निवडण्यात आले आहे.

या कुटुंबांना प्रकल्पाची व पोषणासंबंधीची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने शेतकऱ्यांसाठी नेहमीसाठी लागणारे अन्नधान्य, भाजीपाला व फळे ह्य एकाच ठिकाणी लावून कमी रसायने वापरून उत्पन्न घ्यायचे आहे. उत्पादित अन्नधान्य फळे व भाजी कुटुंबाला खाण्यासाठी वापरायचे आहे, असे  डॉ. पाडगावकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर यांनीही पोषण मूल्याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच अंकुश रहाटवडे, ग्रामसेवक काळे, कृषी विज्ञान केंद्राचे इरफान शेख, किशोर शेरे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील लाखेगावच्या महिलांची रक्त तपासणी केल्यास असे दिसून आले, की ४१ टक्के महिला व मुली अ‍ॅनिमिया आजाराने ग्रस्त असून या अनुषंगाने दत्तक कुटुंबीयांना लोहयुक्त बाजरी, ज्वारी, भगर व राजगिरासारखे पौष्टिक पिकांचे बियाणे वाटप करण्यात आल्याचे डॉ. पाडगावकर यांनी सांगितले.