मद्यप्राशनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप

औरंगाबाद : अति मद्यसेवनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या काही नागरिकांनी गारखेडा परिसरात असलेल्या विजयनगरातील देशी दारूच्या दुकानावर सोमवारी दुपारी हल्ला चढवला. दुकानातील देशी दारूच्या बॉक्सची तोडफोड केली. तसेच रस्त्यावर बाटल्या फोडून बॉक्स पेटवले. या प्रकारामुळे विजयनगरात सायंकाळपर्यंत तणावपूर्ण शांतता होती.

विजयनगर परिसरातील श्याम विश्वनाथ फाजगे (वय ४२) यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मीनारायण सिनगारे यांनी दिली. घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम हा काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होता. नैराश्यात तो दारू पित होता. रविवारी त्याने अतिमद्य प्राशन केले. सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. श्याम मीनाबाई के. जैस्वाल यांच्या देशी दारू दुकानावर जात होता. दारूमुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत, असा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी श्याम फसगे याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून आल्यानंतर नागरिकांनी मीनाक्षी जैस्वाल मालक असलेल्या दुकानावर हल्ला चढवला. श्यामचे नातेवाईक आणि परिसरातील शंभरपेक्षा अधिक संख्येच्या जमावाने जैस्वाल यांच्या दुकानाचे कुलूप तोडून हल्ला चढविला. दुकानातील दारूचे बॉक्स रस्त्यावर टाकून त्यातील बाटल्या फोडल्या. दारूच्या बाटल्या फोडून त्या रस्त्यावरच पेटविण्यात आल्या.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

देशी दारूच्या दुकानावर संतप्त नागरिकांनी हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मीनारायण सिनगारे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पोलिसांना जमावाला पांगवून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले. या वेळी अतिशीघ्रकृती दलाला देखील पाचारण करण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत या परिसरात तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, सायंकाळी देशी दारू दुकानाची मालक मीनाबाई जैस्वाल हिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सुरू होती.