06 April 2020

News Flash

मुस्लीम मोर्चाच्या दिवशी प्राणीमित्र महेबूब चाचाचे ‘परमेश्वरी कार्य’

लातूर शहरात बुधवारी मुस्लीम आरक्षण मोर्चाची धामधूम सुरू होती.

लातूर शहरात बुधवारी मुस्लीम आरक्षण मोर्चाची धामधूम सुरू होती. पुरुष मंडळी मोर्चाला जाण्याच्या लगबगीत होती. सकाळी आठच्या दरम्यान लातुरातील प्राणीमित्र महेबूब इसाक सय्यद यांचा फोन खणखणला. समोरच्या व्यक्तीने ‘चाचा नांदेड रोडवर गरुड चौकाजवळ एका गायीच्या वासराचे दोन्ही पाय एक वाहन धडकल्यामुळे मोडले असून त्याच अवस्थेत ते वासरू व त्याची आई दोन दिवसांपासून एका जागेवर पडून आहेत’, असे सांगितले. महेबूब चाचाने  मोर्चाकडे पाठ फिरवली आणि मुलाला सांगितले, ‘तू मोर्चाला जा, माझ्याकडे दुसरे काम आहे.’ मोर्चानंतर गल्लीतल्या लोकांनी महेबूब चाचांना विचारले मोर्चात का नव्हता, तेव्हा ते म्हणाले, ‘मुझे अल्लाहने अलग काम दिया है, वो करने गया था!’ त्या दिवशी महेबूब चाचाने अपघातात जखमी झालेल्या वासराला घरी आणले. त्याचे पाय कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, पण वासरू जिवंत आहे.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या वासराच्या पायाला चिंध्या बांधल्या होत्या व त्याला उचलून रस्त्याच्या दुभाजकात ठेवले होते. त्याची आई वासराचे भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्याच्याजवळच उभी होती. महेबूब चाचाने तातडीने आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्या वासराला टेम्पोत घालून पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथील डॉ. थोरात, डॉ. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विलंब न लावता तुटलेल्या पायांवर शस्त्रक्रिया करून टाके घातले. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळीच जर उपचार झाले असते तर कदाचित हे वासरू दोन्ही पायांवर उभे राहू शकले असते.

आता जीव वाचला तरी त्याला त्याच्या पायावर उभे राहता येणार नाही. वासराचा जीव वाचला. मात्र, त्याला सांभाळायचे कोणी, त्याची जखम बरी होईपर्यंत देखभाल कोणी करायची, असा प्रश्न होता. ज्या ठिकाणाहून आणले त्या ठिकाणी सोडले तर भटकी कुत्री त्याला फाडून खातील. या विचाराने महेबूब चाचाच्या मनात काहूर निर्माण झाले व त्यांनी डॉक्टरांना मी या वासराला घरी घेऊन जातो व माझ्या जीवात जीव असेपर्यंत त्याची काळजी घेतो, असे सांगून त्याला घरी नेले. डॉक्टरांनी त्याच्या पायाखाली गादी करावी लागेल, असे सांगितल्यानंतर महेबूब चाचाने स्वतच्या हाताने गवत घालून गादी तयार केली. आज ते वासरू जगले आहे आणि महेबूब चाचा त्याची देखभाल करत आहेत.

संवेदनशीलता, प्रेम, जिव्हाळा हे आतून असावे लागते. महेबूब चाचा पोटच्या लेकराप्रमाणे त्या वासराची काळजी घेत आहेत. त्याला हिरवे गवत व पाला खाऊ घालत आहेत. महेबूब चाचा म्हणाले, ‘वाहन चालवणाऱ्याने रस्त्यावरील सर्वाचीच काळजी घ्यायला हवी. त्या जागी एखाद्या मातेचे मूल असते व ते कायमचे अपंग झाले असते तर तिला काय वाटले असते? गोमातेच्या भावना व त्या महिलेच्या भावना यात काही फरक आहे का?’ बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

गायीच्या रक्षणाचा कायदा करणे सोपे आहे; पण संरक्षणाचे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा. पक्षी, प्राणीमात्रांवर प्रेम करा असा केवळ सल्ला देऊन चालणार नाही, तर तशी वृत्ती अंगीकारणारी महेबूब चाचांसारखी मंडळी वाढायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2016 1:07 am

Web Title: animal friends mahebub uncle
Next Stories
1 ‘आत्महत्या नको तर काय करू? पर्याय तुम्हीच सांगा..’
2 ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सप्तक रंगले
3 जिल्हा बँकांमध्ये तीन हजार कोटी रुपये पडून!
Just Now!
X