21 March 2019

News Flash

ट्रकचोरीचे धागेदोरे धुळे, हरयाणापर्यंत

यामागे धुळय़ातील जावेद मणियार हा मुख्य दुवा असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

आणखी एका आरोपीला अटक

औरंगाबाद : चोरीच्या डंपर, ट्रकचे चेसीस आणि इंजिन क्रमांक बदलून विक्री करण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे धुळे, हरयाणापर्यंत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने चोरीचे ट्रक हरयाणातही विक्री केल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रक चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीला भिवंडी पोलिसांनी अटक केल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनीही एमआयएम नगरसेवकाचा भाऊ शेख बाबर शेख अख्तर (३८, रा. देवळाई परिसर) याला गुन्हे शाखेने अटक केली होती. देवळाई परिसरातच राहणारा शेख अख्तर याचा साथीदार अलीम हमीद पटेल (३८, रा. विनायक पार्क) आणि आमेर खान खिजर खान (२६, रा. उस्मानपुरा) या दोघांनाही अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे अलीम पटेल याने हरयाणातून चोरीचे दहा ट्रक खरेदी करून त्यांच्यात हेराफेरी केली आहे. त्याने या दहा ट्रक कोणाला विकल्या याचा पोलीस आता शोध घेत आहेत. एमआयएमचा नगरसेवक जफर शेख याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा भाऊ शेख बाबर याला औरंगाबाद गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस कोठडीदरम्यान त्याने दिलेली माहिती अशी की, चोरलेला डंपर (एमएच-२३-डब्ल्यू-९४०३) भोकरदन तालुक्यातील येथील भारत सांडू िशदे (रा. बेलोरा) व राजू सहाणे यांना विकला होता. हा डंपर भिवंडी पोलिसांनी जप्त केला आहे. आमेर खानच्या नावे असलेल्या मालवाहू ट्रकची (एमएच-२०-डीई-२३५९) शेख बाबरच्या गॅरेजमध्ये बॉडी कट करून तो दुरुस्त करण्यात आला. पोलिसांच्या तपासणीत ट्रकच्या कागदपत्रांप्रमाणे इंजिन क्रमांक आणि आरसी बुकमध्ये तफावत दिसून आली. तसेच हा ट्रक अलीम पटेलने हरयाणाहून खरेदी करून आणल्याचे बाबरने पोलिसांना सांगितले आहे. हरयाणातून औरंगाबादेत आणलेल्या ट्रकचा पूर्वीचा क्रमांक एचआर-७३-ई-८४१६ असा होता. आता त्या ट्रकचा बनावट क्रमांक एमएच-२०-डीई-२९०६ असा आहे. सध्या चोरीचे दोन्ही ट्रक आमेर खानच्या नावावर आहेत. त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

जावेद मणियार पोलिसांना सापडेना

यामागे धुळय़ातील जावेद मणियार हा मुख्य दुवा असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मणियारसोबत तिघांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती पोलिसांना अद्याप प्राप्त झालेली नाही. त्याला अटक झाल्यानंतर ट्रकमधील चेसीस क्रमांकाच्या हेराफेरीबाबत अधिक माहिती उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.

दीड वर्षांत ३५ ट्रक विकले

महाराष्ट्रासह, परराज्यातील ट्रक चोरी करून त्या ट्रकला नवीन रूप देऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रक विक्री करणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीने कोटय़वधींची माया जमा केली असून, टोळीने गेल्या दीड वर्षांत ३५ ट्रक विक्री केले आहे. अर्ध्या  किमतीत ट्रक ग्राहकांना विक्री करीत होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत आमेर खान, अलीम हमीद पटेल, शेख बाबर, जफर बिल्डर या चौघांना अटक केली आहे. या टोळीतील दोन मुख्य सूत्रधार फरार आहेत.

First Published on May 11, 2018 4:05 am

Web Title: another accused arrested in truck theft