औरंगाबाद :  राज्यात गेल्या १८ महिन्यात १.७१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यातील ५२ मोठ्या कंपन्यांपैकी ३६ कंपन्यांच्या जागेचे वाटप पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात आणखी ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसात त्यातील २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार होतील, अशी स्थिती असून औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीमध्ये यामधील डेटॉल कंपनीची गुंतवणूक ५०० कोटी रुपयांची असेल, तर  हैदराबादस्थित श्रीनाथ कंपनीची २५३ कोटी रुपये गुंतवणूक असेल, असे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी  सांगितले. केवळ एवढेच नाही, तर राज्यातील विविध औद्योगिक विकास महामंडळात गेल्या वर्षभरात २२ हजार कोटीची गुंतवणूक झाल्याचेही ते म्हणाले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या दौऱ्यात सहभागी असणाऱ्या अनबलग यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील गुंतवणुकीबाबतची माहिती दिली.