तिसऱ्या लाटेचा धोका कायम

औरंगाबाद : करोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे. शहरात करोना आणि लसीकरणामुळे सुमारे आठ  लाख व्यक्तींमध्ये प्रतिपिंडे तयार  झाली आहेत. तरी देखील तिसऱ्या लाटेत चार लाख  नागरिक बाधित होण्याचा धोका आहे. ऑगस्ट महिन्यात ही लाट येऊ शकेल असे सांगण्यात येत आहे.

देशातील २१ राज्यांमधील ७० जिल्ह्य़ात चौथा राष्ट्रीय सेरो सव्‍‌र्हे करण्यात आला. या राष्ट्रीय सेरो सव्‍‌र्हेक्षणात काढण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार देशातील सुमारे ४० कोटी नागरिकांना तिसऱ्या लाटेत करोना होण्याचा धोका आहे. मनपा प्रशासक पाण्डेय यांच्या अंदाजानुसार शहरात करोनाची दुसरी लाट ओसरली असून या लाटेत सुमारे १ लाख चार हजार पर्यंत नागरिक करोनाबाधित झाले होते. दुसऱ्या लाटेपेक्षाही तिसरी लाट भयंकर असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या साधारणपणे १२ लाख इतकी आहे. त्यामध्ये दहा वर्षांत अंदाजे तीन लाख वाढ झालेली असून १५ लाख इतकी लोकसंख्या गृहीत धरली जाते. लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ११ लाख ७६ हजार ९९९ इतके देण्यात आलेले आहे. आतापर्यंत ५ लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

करोना होऊन गेल्यामुळे  प्रतिपिंडे तयार झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे अडीच लाख इतकी आहे. त्यामुळे सुमारे आठ लाख नागरिकांना संसर्गाची शक्यता कमी आहे. ऑगस्ट महिन्यात करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गाफील न राहता लसीकरण करून घ्यावे तसचे हात धुणे, मुखपट्टी वापरणे तसेच अंतर नियम पाळावेत असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.