24 September 2020

News Flash

‘अँटिजेन’ चाचणीचे साहित्य पोहोचले, रुग्णसंख्येचे भय वाढल्याने टाळेबंदीला प्रतिसाद

तिसऱ्या दिवशी ‘अँटिजेन’ चाचण्या वाढल्या

तिसऱ्या दिवशी ‘अँटिजेन’ चाचण्या वाढल्या

औरंगाबाद : शहरातील टाळेबंदीमध्ये चाचण्यांचा वेग वाढविण्यावर भर आहे. प्रतिदिन ५०० चाचण्या करता याव्यात म्हणून मागविण्यात आलेले साहित्य महापालिकेकडे पोहोचले असून येत्या काही दिवसांत रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘अँटिजेन’ चाचण्यामुळे रुग्ण वाढतील म्हणून कोविड उपचार केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यावर महापालिकेकडून जोर दिला जात आहे. करोनाच्या ‘आरटी-पीसीआर’ चाचणीस प्रतिव्यक्ती दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो तर ‘अँटिजेन’ चाचणीचा खर्च ५०० रुपयांपर्यंतच येतो. या चाचण्यांचा चांगला उपयोग होत असल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला. दरम्यान, औरंगाबाद शहरातील टाळेबंदीचा तिसरा दिवसही शुकशुकाट आणि रस्त्यांवर शांततेचा होता. दरम्यान शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत १६६ने भर पडली. तसेच एकूण मृतांची संख्या ३५४ झाली आहे.

शहरातील प्रत्येक रस्त्यावर येणाऱ्या वाहनातील व्यक्तींची चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रातही या चाचण्या अधिक प्रमाणात करण्याचे ठरविण्यात आले आहे. रविवारीही अँटिजेन व आरटी-पीसीआर चाचण्या घेण्याचे हे प्रमाण २ हजार ३२६ एवढे होते. या चाचण्यांमध्ये १२२ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील बहुतांश भागामध्ये टाळेबंदीचे पालन करण्यात आले. शहरातील विविध भागात गर्दी होता कामा नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. मात्र, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना इंधन मिळविण्यासाठी मात्र द्राविडी प्राणायम करावे लागले. टी.व्ही सेंटर परिसरातील एका पेट्रोलपंपावरून इंधन मिळत असल्याने तिथे गर्दी होते. वृत्तपत्र व दूध विक्रेत्यांना त्यामुळे मोठी अडचण होत आहे. शहरातील विविध चौकात पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी करत असल्याने नाहक फिरणाऱ्यांवर आळा बसला. दरम्यान, औरंगाबाद शहराबरोबरच पैठण शहरातील व्यापाऱ्यांनी आणि प्रशासनाने सात दिवस संचारबंदी पाळण्याचे ठरविले आहे.  शहरातील रास्त भाव दुकानातून गरजू व्यक्तींना धान्य पुरविण्याचीही सोय करण्यात आलेली आहे.

शहरातील विविध भागात रविवारी चाचण्या घेण्यात आल्या. तत्पूर्वी टाळेबंदीची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी रात्रीपर्यंत विविध भागात पाहणी केली. अगदी उशिरापर्यंत ते बळिराम पाटील, सेंट्रल नाका चौक, चिस्तिया चौक, जय भवानीनगर या भागात दुचाकी चालविणाऱ्यांना थांबवून नाहक फिरणाऱ्यांवर कारवाई केली. करोनाबाधितांवर उपचारासाठी  ६० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची बागला ग्रुपकडून मदत केली आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सामाजिक दायित्व म्हणून उद्योजकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रुग्णांचे निदान होण्यासाठी पालिकेच्या वतीने संशयितांची ‘अँटिजेन’ चाचणी केली जात आहे.

लातूरमध्ये अठ्ठावीस करोनाबाधितांची भर

जिल्ह्यात नव्याने अठ्ठावीस करोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६६३ झाली असून बरे झालेले रुग्ण ३२८ असून सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण २९८ आहेत तर आजवर ३२ जणांचे मृत्यू झाले आहेत. शनिवारी आलेल्या नव्याने २८ करोनाबाधितांपैकी २४ जण लातूरमधील असून उदगीरमधील दोन तर चाकूर मधील दोघांचा समावेश आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत भर पडत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच चिंतेचे वातावरण पसरले आहे. शनिवारपासून लातूर महानगरपालिकेने करोना प्रतिबंधासाठी आरोग्य तपासणी सुरू केली आहे. २५७ पथके कार्यरत करण्यात आली असून शनिवारी शहरातील पाच हजार घरांतील २३ हजार जणांची तपासणी करण्यात आली.

जालना शहरात ५२ नवे रुग्ण

जालना शहरात नव्याने ५२ रुग्णांची भर पडली असून जालना शहरातील करोनाबाधितांची संख्या एक हजार ४३ एवढी झाली आहे. या पैकी ५९६ करोनामुक्त झाले असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढत आहे. ५२ पैकी तीन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

हिंगोलीत चार रुग्ण वाढले

जिल्ह्यातील शनिवारी रात्री नव्याने चार करोना रुग्ण वाढले. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३३२ वर पोहोचली होती, त्यापैकी २७२ रुग्ण बरे झाले. सध्या ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:11 am

Web Title: antigen corona test in aurangabad lockdown in aurangabad zws 70
Next Stories
1 रस्त्यात सापडलेले अडीच लाख परत
2 Coronavirus : औरंगाबादमध्ये बाधितांचा आकडा आठ हजारांवर
3 टाळेबंदीच्या प्रयोगात मराठवाडय़ाची फरफट
Just Now!
X