गेवराईत सशस्त्र दरोडा; दरोडेखोरांकडून दोन मुलींवरही हल्ला

गेवराई शहरात अज्ञात दरोडेखोरांनी तासभर धुमाकूळ घालत भवानी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यासह त्यांच्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. दाम्पत्याच्या दोन मुलींवरही हल्ला करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. बुधवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेने जिल्ह्य़ात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरांनी घरातील कपाटासह अन्य ठिकाणी सामानाची नासधूस करत लाखोंचा ऐवज लुटला आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनी भेट दिली आहे.

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील गेवराई येथील गणेशनगर आणि सरस्वतीनगर भागात बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सरस्वतीनगरमधील संतराम जोजारे या सराफ व्यापाऱ्याच्या घरामध्ये लुटीचा प्रयत्न केल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा गणेशनगर भागातील भवानी अर्बन बँकेचे वसुली अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घराकडे वळविला. बाजूच्या घरांच्या कडय़ा लावून दरोडेखोरांनी घाडगे यांच्या दरवाजावर थाप मारली. ओळखीचे कोणीतरी आले असावेत म्हणून आदिनाथ घाडगे यांच्या पत्नी अलका घाडगे यांनी दार उघडताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. अलका घाडगे (वय ४२) यांची हत्या करून त्यांनी झोपेत असलेल्या आदिनाथ घाडगे (वय ५०) यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचाही खून केला. माहेरी आलेली मुलगी वर्षां संदीप जाधव (वय २७) व स्वाती आदिनाथ घाडगे (वय १८) या दोघींवरही हल्ला केला. यात वर्षां हिच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून तिला बीड येथून औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर स्वाती हिच्यावर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी स्वाती घाडगे हिच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबम्रे यांनी भेट दिली. श्वान पथकाने जवळ असलेल्या एका शाळेपर्यंत माग काढला असला तरी दरोडेखोरांविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी जिल्हाभरात नाकाबंदी करून त्यांचा शोध सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील दोघांची हत्या करून दोघी बहिणींवर हल्ला झाल्याने गेवराईसह जिल्हाभरात खळबळ उडाली असून घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून नातेवाइकांनी आक्रोश केला. आमदार लक्ष्मण पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, विद्या पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन नातेवाइकांना धीर दिला.

दरोडय़ाचा बनाव?

मृत आदिनाथ घाडगे हे भवानी अर्बन बँकेच्या मुख्य शाखेत वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होते. या घटनेमागे दरोडय़ाचा बनाव असल्याची शंकाही व्यक्त केली जात असून मध्यरात्री थाप पडताच दरवाजा कसा उघडला गेला? या प्रश्नाचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.