नांदेड महापालिकेच्या प्रचारात राज्यातील प्रमुख नेत्यांचा सहभाग; पुढील बुधवारी मतदान

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पुढील बुधवारी मतदान होणार असून अपेक्षेप्रमाणे निवडणूक प्रचारात रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे सुरू झाले असून, सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या विरोधात ताकदीनिशी उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने त्यात आघाडी घेतली आहे.

काँग्रेसचा ४० पानी निवडणूक जाहीरनामा दणक्यात प्रकाशित झाला तर भाजपचा जाहीरनामा प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या पाश्र्वभूमीवर सगळ्याच बाबतीत काँग्रेस आधी म्हणजेच पुढे तर भाजप मागे. हे चित्र निवडणूक निकालातही दिसणार काय, ते आज ठामपणे सांगता येत नसले तरी काँग्रेसने बहुमतासह निवडणूक जिंकण्याचा विश्वास जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर भाजपने ‘मिशन ५१’ असे फलक शहरात झळकावले आहेत.

मनपाची ही पाचवी निवडणूक असून आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष केंद्रस्थानी आणि मग इतर पक्षांच्या जागांचे अंदाज अशी स्थिती राहिली. आधीच्या निवडणुकांत काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना पक्षाचा विचार केला जात असे.   या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवसेनेची जागा भाजपने घेतली असून केंद्रात सरकार, राज्यातही सरकार हा भाजपचा या निवडणुकीतील मुख्य आधार आहे ; पण काँग्रेसचा पारंपरिक जनाधार तोडून या पक्षाला बहुमताचा पल्ला गाठायचा असला तरी पक्षाकडे स्वभांडवल अगदी नगण्य होते. त्यामुळे इतर पक्षांचे नगरसेवक, कार्यकत्रे फोडून या पक्षाला उमेदवारांची जुळवाजुळव करावी लागली.

भाजपकडून सहाच निष्ठावंतांना संधी

स्थानिक पातळीवर त्यांना ‘दलबदलू अशी विशेषणे लागली असून भाजपच्या या प्रयोगाचा स्वीकार मतदार करणार काय, हा मुख्य प्रश्न आहे. भाजपच्या ८० उमेदवारांपकी सहा जण जुने निष्ठावान. गेल्या काही वर्षांत पक्षात आलेले. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आले आणि उमेदवार झाले. भाजपने निवडणुकीची  सूत्रे ज्या त्रिकुटाच्या हाती सोपविली ते संभाजी निलंगेकर, प्रताप चिखलीकर आणि श्यामसुंदर शिंदे हाळदेकर हे तिघेही लातूर जिल्हा आणि लातूर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित असल्याने या निवडणुकीत नांदेड विरुद्ध लातूर असा एक नवा पलू निर्माण झाला आहे.

निलंगेकरांनी लातूर मनपात परिवर्तन घडविले

काँग्रेस पक्षाने गांधी जयंती दिनी आपल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करून पुढच्या पाच वर्षांतील कामांचे, विविध उपक्रमांचे आपले नियोजन सादर केले. या जाहीरनाम्यातील आपल्या मनोगतात तसेच प्रकाशन सोहळ्यातील भाषणात चव्हाण यांनी नांदेडच्या विकासाबद्दलची भूमिका मांडली. स्थानिक विरोधकांपकी कोणाचेही थेट नाव न घेता त्यांनी टीकाटिप्पणी केल्यानंतर काँग्रेसच्या या जाहीरनाम्यापेक्षा सरस, प्रभावी, लक्षवेधी जाहीरनामा नांदेडकरांपुढे सादर करणे भाजपचे प्रथम उद्दिष्ट असायला हवे होते; पण चारचौघे घाईघाईने एकत्र आले आणि त्यांनी आपली चव्हाणविरोधी मळमळ तत्परतेने व्यक्त केली.

निलंगेकर तळ ठोकून 

लातूरमधील भाजपच्या परिवर्तनाचे शिल्पकार संभाजी पाटील निलंगेकर नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. आतापर्यंत अनेक प्रभागांमध्ये त्यांनी सभा-बठका घेतल्या. कार्यकर्त्यांना सक्रिय केले. पथनाटय़, प्रचाररथ आदी माध्यमांतून चाललेल्या भाजपच्या प्रचाराला गती देण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे शुक्रवारी नांदेडला येत आहेत.