ठोक बाजारात २० रुपये किलोचा दर

औरंगाबाद : कांद्याला सध्या क्विंटलमागे २ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिळणारा हा दर मालाच्या तुटवडय़ामुळे नसून शेतक ऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा बाजार समित्यांमध्ये आणण्यासाठी २ हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर अनेक बाजार समित्यांनी काढलेला असून त्याला कृत्रिम दरवाढ म्हणावी लागेल, असे कृषी मालाच्या बाजारपेठेतील अभ्यासकांचे मत आहे.

औरंगाबादेतील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतच रविवारी २० रुपये किलोचा कांद्याला दर होता. सोमवारी बाजार समितीत १५०५ क्विंटल कांद्याची आवक होती तर कमाल दर एक हजार ८५० रुपये होता. इतर काही ठिकाणच्या बाजार समितीतही २ हजार रुपये क्विंटलच्या आसपास दर होता. सध्या गल्लोगल्ली जाऊन हातगाडय़ांवरून भाजी विकणाऱ्यांकडे कांद्याचा दर किलोमागे ३० ते ३५ रुपये आहे.

कांद्याचे दर साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान सर्वसामान्यांना रडवतात. या कालावधीत कांद्याचा दर किलोमागे ५० ते १०० रुपयांमध्ये असतात. मात्र, सध्या पेरणी झालेला बहुतांश कांदा शेतातून निघालेला असून त्याची साठवण कांदा चाळीत करण्यात आलेली आहे. कांद्याच्या दरांत अधिक उसळी घेतली जाईल तेव्हा शेतकरी त्यांच्याकडील साठवलेला माल बाहेर काढतील. सध्या शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहे. दर २० रुपये दिसत असला तरी शेतकरी त्यावर समाधानी नसून त्याला २५ रुपये किलो दराची प्रतीक्षा असेल. दरम्यान, कर्नाटकातील कांदा महाराष्ट्राच्या बाजारात दाखल झाला तर मात्र, कांद्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाज नाकारता येत नाही, असे स्थानिक पणन मंडळाचे पदाधिकारी सीताराम वैद्य यांनी सांगितले.

कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतक ऱ्यांकडे साधारण १०० ते ३ हजार क्विंटलने माल पडून आहे. देशभराचा विचार केला तर साधारण २० लाख टन कांदा पडून असण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात आदी राज्यांचाही समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील गंगापूर, सिल्लोड भागातील अनेक शेतकऱ्यांकडे कांदा पडून असून बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकही मंदावली आहे. परिणामी कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी दरवाढ केल्याचे दिसत आहे.

कांदाची दरवाढ होईल, या आशेने शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवलेला आहे. उत्पादकाकडे १०० ते ३ हजार क्विंटलपर्यंतचा माल पडून आहे. कांदाच उपलब्धच नाही, अशी परिस्थिती नाही. कांद्याचा बाजारभाव वाढवला जातो. त्यातून शेतकरी आकर्षित होऊन माल बाजारात आणतो. एकदा का आवक वाढली की दर खालीही येतो. सध्या शेतकरी पेरणीच्याही कामात व्यस्त असल्याने त्याला माल बाजारात आणता येत नाही.

– सीताराम वैद्य, पदाधिकारी, स्थानिक पणन मंडळ, औरंगाबाद