औरंगाबाद शहरातील तीन हजार कलाकारांचे हाल

औरंगाबाद : बिअर बार, रेस्टॉरंटसह बाकी सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. केवळ मनोरंजनाच्या क्षेत्रावरील निर्बंध अजूनही कायम आहेत. अनेक वष्रे सिंथेसायझर वाजविणारा अमर वानखेडे सांगत होता, ‘आमच्यावर भिकारी होण्याची वेळ आणू नका. निर्बंध उठवा, सारे नियम पाळू आणि पोट भरू. गेले सात महिने काम नसल्याने तीन हजार कलाकारांवर मोठे संकट आहे. आता टाळेबंदीचे निर्बंध उठवायला हवेत.’ शहरातील सिडको भागात दिवसभर फलक हातात घेऊन अमर वानखेडे याने आंदोलन केले.

गणपती आणि नवरात्रोत्सवात अनेक जण कार्यक्रमांना बोलावत. या वर्षी ‘गरबा’ आयोजन होणार नाही. पण नियम पाळून काही कार्यक्रमांना परवानगी दिली तर अनेक कलाकारांचे जगणे सुस होईल असे वानखेडे यांचे म्हणणे आहे. सिंथेसायझर, ड्रम वाजविणारे तसेच गिटार वादकांना गणपती आणि नवरात्रोत्सवाच्या काळात अधिक रक्कम मिळत असे. प्रतिमाह २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळविणारा अमर वानखेडे हैराण झाला असून तो म्हणाला, आम्ही सरकारकडे अनुदान किंवा मदत मागत नाही. केवळ निर्बंध उठवायला हवेत. आता करोना साथरोगामध्ये कोणती काळजी घ्यायची हे सर्वाना समजले आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून कार्यक्रम होऊ शकतात. पण सरकार काही परवानगी देत नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

विविध क्षेत्रांत कार्यक्रमस्थळी मनोरंजन करणारे अनेक कलाकार सध्या अडचणीत असून केवळ दूरचित्रवाहिन्यावरील कार्यक्रमांना परवानगी म्हणजे कलाकारांना दिलासा असे वातावरण प्रशासकीय पातळीवर आहे. त्यामुळे कलाकारांवरील निर्बंध कमी करावेत, अशी मागणी केली जात आहे.