16 November 2019

News Flash

राज्यातील कला महाविद्यालयांचा अभ्यासक्रम जुनाट

२००० पासून बदल नाही, प्रस्तावित अभ्यासक्रम लालफितीत

|| बिपीन देशपांडे

२००० पासून बदल नाही, प्रस्तावित अभ्यासक्रम लालफितीत

माणसाला सौंदर्यदृष्टी प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कला क्षेत्राबाबत सरकार उदासीन असून कला शिक्षक, जीडीआर्टसारख्या अभ्यासक्रमात साधारण २००० सालापासून कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. कला संचालनालयाने तयार केलेला अभ्यासक्रम अजूनही लालफितीत आहे.

जवळपास दोन दशकांमध्ये संगणकीय किंवा इतर तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली क्रांती पाहता आधुनिक युगाशी नाळ जोडणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी गेल्या काही वर्षांमध्ये जवळपास ७५ पेक्षा अधिक कला महाविद्यालये बंद पडली आहेत.

महाराष्ट्रात सरकारी आणि खासगी मिळून २५० पेक्षा अधिक चित्रकला महाविद्यालये सुरू होती. आज केवळ १७५ महाविद्यालयेच सुरू असल्याचे दिसते. त्यातही खऱ्या अर्थाने १३० महाविद्यालये चालू स्थितीत आहेत. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, औरंगाबाद आणि नागपूर येथे शासकीय कला महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये नाणे बनवणे, वस्त्रकला (टेक्स्टाइल), पेंटिंग, कमíशअल किंवा अ‍ॅप्लाइड आर्ट म्हणजे उपयोजित कला – जी. डी. आर्ट, कला अध्यापक (एटीडी), शिल्पकलासारखे शिक्षण दिले जाते. तर खासगी महाविद्यालयांमध्ये फाऊंडेशनसह इतरही अभ्यासक्रम आहेत. मात्र यातील बहुतांश अभ्यासक्रम मागील १८-१९ वर्षांपासून त्या काळाशी संबंधित आहेत. या कालावधीनंतर आधुनिक तंत्रज्ञानात मोठी क्रांती झाली. चित्रकलेव्यतिरिक्त शिक्षणातील इतर अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात येत असले तरी चित्रकलेच्या क्षेत्रात मात्र २००० सालापासूनचेच बहुतांश अभ्यासक्रम आहेत. विशेषत जीडी आर्ट आणि एटीडी अर्थात कला अध्यापक शाखेचे अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमातील विषयांची आधुनिक तंत्रज्ञान, संगणक यांच्याशी सांगड घालण्यात आलेली नाही.

कलासंचालनालयाने कलाध्यापक आणि जीडी आर्ट अभ्यासक्रम तयार केले आहेत. मात्र त्याला काही वष्रे झाली असली तरी अद्याप या नव्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली नाही. कलासंचालकांचे पदही प्रभारी असल्यामुळे त्यांना चित्रकलेचा अभ्यासक्रम बदलण्यासाठी वेळ नाही. तसेच शासकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत, त्याही भरल्या जात नाहीत. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात वस्त्रकलेची एक जागा, कलाध्यापक तीन, उपयोजित कला (अ‍ॅप्लाइड) व पेंटिंग, या अभ्यासक्रमांच्या मिळून १८ जागा कायमस्वरूपी भरण्यात आलेल्या नाहीत. या जागांवरील प्राध्यापक एक तर तासिका तत्त्वावर किंवा करार पद्धतीने काम करत आहेत. त्यातही काही जागा पूर्णपणे रिकाम्या आहेत. अशीच अवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मास्टर ऑफ फाइन आर्ट विभागाचीही आहे. या विभागात एक विभाग प्रमुख व एक जण करार तत्त्वावर, असे दोनच जण काम करीत आहेत.

चित्रकला महाविद्यालयांशी संबंधित कलाध्यापक, जीडी आर्टच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल आवश्यक आहे. जो अभ्यासक्रम सुरू आहे तोही प्रायोगिक तत्त्वावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम हवा आहे. कला प्राध्यापकांचीही भरती करावी लागणार आहे. कला संचालक पदावर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे.   – रवींद्र तोरवणे, प्राचार्य, यशवंत कला महाविद्यालय

रोजगाराच्या संधीअभावी विद्यार्थी चित्रकलेच्या क्षेत्राकडे पाठ फिरवत आहेत. जे शिक्षण आहे त्याला संगणकीकरणाची जोड नाही. विद्यार्थी संख्येअभावी आदर्श चित्रकला महाविद्यालय बंद केले.    – राहुल वेलदोडे, संस्थापक

First Published on June 8, 2019 12:59 am

Web Title: arts colleges