नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याची प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून केवळ कागदावरच सुरू आहे. प्रत्यक्षात पाणीसाठय़ात अजिबात वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. निळवंडे धरणातून १५०० क्युसेक वेगाने पाणीपुरवठा केला जात असला, तरी प्रवरेच्या डाव्या कालव्यातून ९७६ व उजव्या कालव्यातून ३०१ क्युसेक वेगाने पाणी वळविण्यात आले आहे. परिणामी ओझरवेअरमध्ये गेल्या चार दिवसांत पाणीच आले नाही. त्यामुळे पाणी सोडण्याची पूर्तता कागदोपत्री करण्याचा घाट घातला जात असल्याने गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाने खुलासा मागविला आहे. पिण्याचे पाणी वळविण्याचा हा उद्योग असंतोष निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जायकवाडी जलाशयात १२.८४ अब्जघन फूट पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय मंडळाने घेतल्यानंतर न्यायालयीन लढय़ातही मराठवाडय़ाची बाजू सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. दि. १ नोव्हेंबरला पाणी सोडण्यात आले. तेव्हापासून आतापयर्ंत जायकवाडीमध्ये १०.४० अब्ज घनफूट पाणी सोडण्यात आले. पकी ६.६३ टीएमसी पाणी जलाशयात आले आहे. कालव्याची पूर्ण क्षमता वापरून सोडण्यात आलेले पाणी महिनाभर नदीपात्रातून येणे सुरू होते. दि. २९ नोव्हेंबरपासून पाणी येणे बंद झाले आहे.
पाणी का येत नाही, याची माहिती घेण्याचा प्रयत्न गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र, वितरणाची अधिकृत आकडेवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे खुलासा मागविण्यात आला. चार दिवसांपासून सुरू झालेल्या पाणी वळविण्याच्या प्रकारामुळे जायकवाडीत पाणी सोडले, अशी कागदोपत्री नोंद तर होते तथापि पाणी काही मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
जायकवाडीत पूर्ण पाणी आल्यानंतर माजलगाव धरणाला किती पाणी द्यायचे याचे नियोजन केले जाणार आहे. दोन टीएमसी पाणी माजलगावला देण्याचे नियोजन केले जाणार आहे.