औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या आता साडेबावीस हजाराहून अधिक झाली आहे. आतापर्यंत ६८४ जणांचा मृत्यू झाला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यूची संख्या ५१५ एवढी झाली आहे. शनिवारी सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दौलताबाद व मंजूरापुरा भागातील आलमगीर कॉलनीतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने विषाणू प्रसारासाठी हे वातावरण अधिक पोषक असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. दरम्यान  १७ हजार २२४ जण करोनामुक्त झाले असून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मृत्यूची संख्या वाढू लागली आहे.

शहरातील विविध भागात आता वर्दळ वाढत आहे. आवश्यक ती काळजीही घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सिरो सर्वेक्षणातून समूह संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे या पुढे अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. एका बाजूला संख्या वाढत असली तरी आजारावर मात करू  आणि या आजारामुळे मृत्यू फारसे होत नाहीत, असा समज पसरविला जात आहे. शहरातील वर्दळीचा परिणाम ग्रामीण भागात होत असून शहराभोवतीच्या गावातून गंभीर स्थितीमध्ये रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे करोना प्रकोप वाढताच आहे.

रुग्ण संख्या साडेबावीस हजारांहून अधिक

जालन्यात संख्या साडेचार हजारांवर

जालना जिल्ह्य़ात शनिवार दुपापर्यंत आरटीपीसीआर आणि प्रतिजन चाचण्या मिळून एकूण ३२ हजार ७६२ करोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी चार हजार ५२० म्हणजे १३.८२ टक्के चाचण्या करोनाबाधित आढळून आल्या आहेत. एकूण करोनाबाधितांपैकी दोन हजार ४०९ रुग्ण ऑगस्ट महिन्यातील आहेत. तीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. करोनाबाधितांच्या सहवास आणि संपर्कातील ५० हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा शोध जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. करोनामुळे जिल्ह्य़ात आतापर्यंत १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्य़ात संस्थात्मक अलगीकरणात २८१ व्यक्ती आहेत. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरली नाही तसेच सामाजिक अंतर ठेवले नाही म्हणून जिल्ह्य़ात आतापर्यंत जवळपास साडेचार हजार व्यक्तींकडून सव्वानऊ लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला.

पोलिसाचा मृत्यू

ग्रामीण पोलीस विभागातील हवालदाराचा शुक्रवारी सायंकाळी करोनामुळे औरंगाबादेत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रदीप देविदास जाधव, असे मृत्यू पावलेल्या हवालदाराचे नाव आहे. जाधव हे एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात मागील काही काळापासून कार्यरत होते. ग्रामीण पोलीस विभागात करोनामुळे मृत्यू पावलेले प्रदीप जाधव हे पहिलेच कर्मचारी असल्याचे मुख्यालयातून सांगण्यात आले.

लातूरमध्ये सात हजार पार

लातूर : लातूर जिल्ह्य़ातील आतापर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या सात हजार ११९ वर पोहोचली असून उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या पाच हजार ३९१ आहे, तर सध्या विविध रुग्णालयात उपचार घेणारे एकूण एक हजार ४७८ रुग्ण आहेत. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २५० एवढी आहे. करोनाचा मृत्युदर हा देशाच्या मृत्युदराच्या दुप्पट आहे, तर तो महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.  शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्य़ात नव्याने १५० करोनाबाधितांची भर पडली. शहरातील मनपाच्या प्रतिजन चाचणी केंद्रात लक्षणे असणाऱ्यांसाठी चाचण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, चाचण्यांची संख्या अद्याप मर्यादितच आहे.