News Flash

‘वास्तवाचे उत्खनन करून सत्याचा शोध लोमटेंच्या कथेत’

माणसांचा शोध घेताना नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणारे लेखनही त्यांच्या कथांमध्ये दिसते.

ग्रामीण व शहरी विश्वात पडलेली दरी, त्यातून निर्माण झालेले नातेसंबंध, शेती व शेतकरी, जागतिकीकरणामुळे समाजातील एका वर्गाला करावा लागणारा संघर्ष, असे आशयाची भिन्नता दर्शवणारे, वाचकांमध्ये अस्वस्थता, जीवघेणी तगमग निर्माण करणारे, वास्तव प्रश्नांचे उत्खनन करताना सत्याचा शोध घेणारे लेखन आसाराम लोमटे यांच्या कथांमध्ये प्रतिबिंबित झालेले आहे, असे भाष्य डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी येथे केले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल कथालेखक व लोकसत्ताचे परभणीचे वार्ताहर आसाराम लोमटे यांचा रविवारी सायंकाळी डॉ. रामचंद्र पाटील यांच्या हस्ते येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आसाराम लोमटेलिखित ‘आलोक’ सह१६ कथांवरील भाष्य करताना डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी लोमटे यांना त्यांची पत्रकारिता लेखनासाठी साहाय्यभूत ठरली असून वंचित माणसांचे विश्व चितारणारे चित्रण त्यांनी केल्याचे सांगितले. ग्रामीण भागात राहणारा शेतकरी भाऊ व शहरात प्राध्यापक असणारा एक भाऊ यांच्यातील नातेसंबंध, त्यातून शेतकरी भावाची आत्महत्या, त्याच्या पत्नीत संघर्षांनंतर आलेला कणखरपणा हे सर्व अस्वस्था, तगमग निर्माण करणारे आहे. कथा या सामान्य माणसाला तळाला खेचणाऱ्या आणि तळ हलवणाऱ्या आहेत. समाजातील वास्तव प्रश्नांना भिडणारे लेखन लोमटे यांनी केले असून कल्पित प्रसंगांचा, प्रतिमांचा अत्यंत कलात्मकतेने आणि चपखलपणे वापर केला आहे. शोषित आणि शोषक वर्ग, जाती भावना, त्यातून दलित कुटुंबाला करावे लागणारे स्थलांतर, सत्तेचे हनन करणारी भावना असे सामाजिक चित्र लोमटे यांच्या कथांच्या केंद्रस्थानी दिसते. माणसांचा शोध घेताना नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणारे लेखनही त्यांच्या कथांमध्ये दिसते. विरोधी पक्षामध्ये वषरेनुवर्षे राहूनही घरातील प्रश्न सोडवू न शकणाऱ्या एका कार्यकर्त्यांच्या जीवनाला पक्षांतर केल्यानंतर कशी कलाटणी मिळते, याचेही यथार्थ चित्रण लोमटे यांनी कथांमधून केल्याचे डॉ. काळुंखे यांनी सांगितले.

कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर, रा. रं. बोराडे, बाबा भांड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2017 1:03 am

Web Title: asaram lomate hounred with sahitya akademi puraskar
Next Stories
1 किनवटमधील ३५० अंगणवाडय़ांना आयएसओ
2 पाकमधील नागरिकांनाही शांतता हवी
3 कर्ज फेडण्यासाठी किडनी विकणे आहे..
Just Now!
X