30 September 2020

News Flash

दलित-मुस्लीम समीकरणाचा शहरी भागातच लाभ!

प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराला असा कायम बांधील मतदार नाही.

प्रकाश आंबेडकर-ओवेसी एकत्र आल्याने राजकीय संदर्भ बदलण्याचे संकेत

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

‘एमआयएम’चे नेते असदुद्दिन ओवेसी यांच्या सभेचे औरंगाबाद शहरातील सर्वसाधारण ठिकाण म्हणजे आमखास मदान. मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम या पक्षाचा पैस तसा मर्यादित. पण शहरी भागात राजकीय यश अधिक. तुलनेने भारिप-बहुजन महासंघाचा परीघ विस्तारलेला. पण राजकीय यश तसे मर्यादितच. बहुजन वंचित आघाडीची मोट बांधत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी ओवेसी यांना आघाडीत सामावून घेतले आणि ओवेसी यांच्या फेटय़ाचा रंग बदलला. पक्षविस्ताराची व्याप्ती वाढण्याची शक्यता दिसताच लहान भावाची भूमिका बजावत ओवेसींनी बहुजन वंचित आघाडीत उडी घेण्याचे ठरविले. ‘एमआयएम’ या विस्ताराचा प्रतल अधिक मोठा करून जाणारा. अन्य कोणी पक्ष त्यांच्याशी जळवून घेईल असे चित्र नव्हते. खरे त्यांनी दलित समाजाला बरोबर घ्यायचे, असा संदेश दिला. उमेदवाऱ्याही दिल्या. पाच दलित समाजाचे नगरसेवक निवडूनही आले. पण पक्षाची प्रतिमा मुस्लीम एवढय़ापुरतीच सीमित होती. ती बहुजन वंचित आघाडीत जाण्याने विस्तारली गेल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील वंचित समाज निवडणुकांमध्ये कसा आपल्याकडे वळला पाहिजे याचे हातखंडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपला माहीत असल्याने बहुजन विकास आघाडी आणि एमआयएमचे नवे समीकरण जुळलेच तर औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणीसारख्या शहरी भागात अधिक लागू पडेल, असा दावा केला जात आहे.

केवळ एका समाजाचे नेतृत्व, अशी ओळख राहू नये म्हणून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अ‍ॅड. असदुद्दिन ओवेसी यांनाही बरोबर घेतले. असे करताना दोन्ही नेत्यांनी डोक्याच्या फेटय़ाचा रंग बदलला. ओवेसी एरवी फक्त पटका घालायचे. त्याच्या बांधणीची ढबही काहीशी निराळी असे. जाहीर सभांमध्ये फेटय़ाला तुराही असायचा. पण प्रतिमा बदलताना रंग बदलत त्यांनी पिवळा फेटा घातला. पुढे प्रकाश आंबेडकरांचा सत्कार करताना घोंगडी आणि हातात काठी देण्यात आली. धनगर समाजाला जवळ करण्यासाठी आखलेल्या धोरणांची प्रतीकात्मकता दिसली पाहिजे, असे सांगणारा संदेश बेरजेच्या राजकारणाचा एक भाग. त्यामुळे शहरातील जबिंदा लॉन्सच्या मदानावरील सभेत ओवेसी यांनी जोरदार भाषण केले. प्रकाश आंबेडकरांना मोठय़ा भावाचा मान देत ओवेसी यांनी  ‘एमआयएम’ला पाय पसरायला जागा मोकळी करून घेतली. मात्र असे करताना त्यांच्यातील अंतर्गत लाथाळ्या लपून राहिलेल्या नाहीत. या युतीचा लाभ बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांना कोणत्या मतदारसंघात अधिक होऊ शकतो याची गणिते आता मांडली जाऊ लागली आहेत. त्यात शहरी भागच अधिक आहे.

लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा, राज्यात बहुजन समाज पक्षाचा (बसप) ठरलेला मतदार आहे. निवडून कोणी का येईना, ती संख्या तशी बदलत नाही. २०१४ च्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत जेवरीकर इंद्रकुमार या उमेदवारास ३७४१९ मते मिळाली होती. त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपच्या नावावर ३२ हजार मते होती. औरंगाबाद जिल्ह्य़ातील विधानसभा मतदारसंघनिहाय बसपच्या उमेदवाराला सरासरी किमान अडीच ते कमाल साडेतीन हजार मते मिळाली होती. याचा अर्थ एक वर्ग या पक्षाला कायम बांधील आहे.

बहुजन वंचित आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराला असा कायम बांधील मतदार नाही. त्यांच्याविषयी कमालीचे आकर्षण आहे. त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी लांबून लोक येतात, गर्दीही करतात. पण गर्दी मतदान करेपर्यंत साथ देईल का, या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल. पण पक्षविस्तार करायचा असतो असे मानून नेत्यांनी उचललेली पावले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारास पराभवाकडे ढकलणारी ठरतील.

‘एमआयएम’ला मराठवाडय़ात साथ मिळाली खरी. नांदेडपाठोपाठ औरंगाबाद व बीडमध्ये महापालिका आणि नगरपालिकामध्ये यश मिळाले खरे, पण त्यांना ते टिकवून ठेवता आलेले नाही. पक्षात सातत्याने सुंदोपसुंदी सुरू असते. पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. या पक्षाचा प्रभाव तसा ओसरू लागण्याचा काळ असतानाच बहुजन आघाडीत ओवेसी यांनी घेतलेली उडी त्यांना पोषक ठरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाषणाच्या पातळीवर आक्रमक असणारे अ‍ॅड. ओवेसी मोठा भाऊ असे प्रकाश आंबेडकरांना सभेत संबोधताना दिसून आले. वंचितांच्या आघाडीचे बदलत जाणारे रंग ओवेसींच्या पथ्यावर पडण्याची शक्यताच अधिक आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास लक्षात घेता एमआयएम हा पक्ष धार्मिक तेढ निर्माण करणारा आहे, असे बहुसंख्य व्यक्तींना वाटते. त्यामुळे ‘एमआयएम’ला जवळ करण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय ओवेसी यांना बळ देणारा ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निजामविरोधी भूमिका बघता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला किती मदत होईल, याविषयी शंका आहेत. त्यांनी अशी आघाडी करू नये, असेच वाटते आहे.

– जयदेव डोळे, राजकीय विश्लेषक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 4:13 am

Web Title: asauddin owaisi prakash ambedkar tie up for 2019 elections
Next Stories
1 मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती, ३००० गावांची हंगामी पैसेवारी ५०च्या आत
2 लॅण्डिंग करताना मुंबई – औरंगाबाद विमानाला धडकला पक्षी आणि नंतर…
3 हमीभावाअभावी शेतकरी मेटाकुटीला
Just Now!
X