सरकारने मोठा गाजावाजा करत जी कर्जमाफी जाहीर केली, ती फसवी असून समोर आलेल्या आकडेवारीवरून सरकारने शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केल्याचे उघड झाले आहे. ही कर्जमाफी ३४ हजार कोटी रुपयांची असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ही कर्जमाफी केवळ ५ हजार कोटी रुपयांची आहे. अशा फसव्या कर्जमाफीला आमचा विरोधच असून संपूर्ण कर्जमाफीचा आग्रह कायम आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.

काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी हे शुक्रवारी (दि. ८) परभणी येथे संघर्ष सभेच्या निमित्ताने येत आहेत. माजी पंतप्रधान  इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेली ही संघर्षसभा येथील जिंतूर रस्त्यावरील नूतन विद्यालयाच्या प्रांगणावर होत आहे. त्यानिमित्त चव्हाण यांनी आज पत्रकार बठकीत ही माहिती दिली. या सभेला राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लोकसभेचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राजीव सातव, राज्यसभा सदस्य खासदार रजनीताई पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी येथे आल्यानंतर चव्हाण यांनी नियोजित सभास्थळाची पाहणी करून प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, युवक काँग्रेसचे नागसेन भेरजे आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलतांना चव्हाण यांनी शिवसेनेवरही टीका केली. शिवसेनेची या सरकारमध्ये फरफट होत असल्याचे ते म्हणाले. ‘रालोआ’चा मृत्यू झाला आहे, असे विधान शिवसेनेच्याच नेत्यांनी केले आहे. तरीही ते सत्तेला चिकटले आहेत.

शिवसेनेला स्वाभिमानाबद्दल बोलायचे असेल तर त्यांनी शासनामधून बाहेर पडावे. बहुतेक मुंबईला जो पूर आला आणि अतिवृष्टी झाली त्यातच शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामेही वाहून गेले असावेत, असा टोला चव्हाण यांनी लगावला. कोणत्याही वेळी निवडणुका जाहीर झाल्या तरी काँग्रेस त्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले. नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशाबद्दलही चव्हाण यांनी असे काही घडले नसल्याचे सांगितले.

चर्चा तर अनेकांच्या होत आहेत. मात्र, काँग्रेस सोडून कुणीही गेलेले नाही, असे सांगतानाच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या भाजप प्रवेशाबद्दल त्यांना विचारले असता वर्षांनुवष्रे एकाच ठिकाणी राहणारे लोक जर पक्ष सोडून जात असतील तर त्यांच्या ठिकाणी नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल. सध्या वरपूडकरांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेसचे काम चांगले चालले असल्याचेही ते म्हणाले.

गौरी लंकेश यांची हत्या; पुरोहित सुटतात

एकीकडे नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या झालेल्या असतानाच आता पुन्हा पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या झाली आहे. अशा हत्यांमधले मारेकरी पोलिसांना सापडत नाही; पण दुसरीकडे कर्नल पुरोहित यांच्यासारखी माणसे मात्र सहीसलामत बाहेर सुटत आहेत. मालेगाव मधील आरोपी मात्र वरचेवर सुटून बाहेर येत आहेत. जनतेचा तपास यंत्रणावरील विश्वास उडत चालला आहे, असेही चव्हाण म्हणाले.