पीकविमा भरणाऱ्यांच्या रांगेतील एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर भोकर येथे रविवारी जमलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पोलीस वाहनातील ध्वनिक्षेपकाचा केलेला वापर वादग्रस्त ठरला आहे. चव्हाण यांनी तेथे केंद्र व राज्य सरकार तसेच बँकांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्यामुळे ध्वनिक्षेपकाच्या वापराची बाब पोलीस अधिकाऱ्यांवर शेकवण्याच्या हालचाली चव्हाण विरोधकांकडून सुरू झाल्या.

दिवशी (बु.) येथील शेतकरी रामा पोतरे यांचा शनिवारी किनी येथे बँकेसमोरच्या रांगेत असताना जमिनीवर कोसळून मृत्यू झाल्यामुळे भोकर परिसरातील वातावरण तापले होते. या पाश्र्वभूमीवर खासदार चव्हाण यांनी रविवारी सकाळी भोकरला धाव घेऊन सर्व संबंधितांची भेट घेतली. शासकीय व बँक अधिकारी तसेच त्रस्त शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

खासदार चव्हाण यांच्या आगमनप्रसंगी भोकर येथे एसबीआय बँकेच्या शाखेबाहेर मोठा जनसमुदाय होता. पीकविम्याचा हप्ता भरण्यावरून सर्वत्र निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची उपस्थितांना जाणीव करून देण्यासाठी चव्हाण यांच्यावर बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी तेथील पोलीस वाहनातील ध्वनिक्षेपकाचा वापर केला.

या प्रसंगाचे अनेकांनी चित्रीकरण करून छायाचित्रे तसेच चित्रीकरणाची क्लिप समाजमाध्यमांवर टाकल्यामुळे येथे नवा वाद सुरू झाला आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस उपअधीक्षकांशी संपर्क साधला असता भोकर येथील प्रसंग लक्षात घेता अशा वेळी लोकप्रतिनिधीला ध्वनिक्षेपकाचा वापर करू देण्यात गर काहीच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

दानवे यांची टीका

खासदार अशोक चव्हाण यांनी पोलीस वाहनातील ध्वनिक्षेपकाचा वापर करून शासनावर टीका केल्याची बाब नांदेड मुक्कामी असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास काही पत्रकारांनी आणून दिली. त्यावर माजी मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही, असा टोला त्यांनी लगावला. पण दानवे यांच्या पक्षातील माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांच्यासह भाजपचा एकही जबाबदार नेता भोकर तालुक्याकडे किंवा त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे फिरकला नाही.

कुठल्याही शेतकऱ्याला अडचण होता कामा नये. त्याचा संपूर्ण पीकविमा शासनाने घेतला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. यात मला राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही भांडलो. त्यांना आम्हीच कर्जमाफी मिळवून दिली. बँकांमधल्या भोंगळ कारभाराला हे शासन जबाबदार आहे.   खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष