मराठवाडय़ातील दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलासा देता येईल, असे निर्णय घेण्याऐवजी राज्य सरकारमधील मंडळी ‘शेळ्या-मेंढय़ा’ वाटत आहेत, अशी टीका करतानाच असे करण्याऐवजी त्यांनी योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. पाणीपुरवठामंत्री बबन लोणीकर आणि शिवसेनेकडून जालना व उस्मानाबाद जिल्ह्य़ांत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेळ्या वाटप करण्यात आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर त्यांनी ही टीका केली.
३६५ दिवस रोजगार उपलब्ध करून देणारी एकमेव यशस्वी योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा उल्लेख करावा लागेल. मात्र, गेल्या सव्वा वर्षांत या योजनेच्या अंमलबजावणीत सरकार असंवेदनशील होते. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोजगार हमीसाठी मजुरांकडून आवश्यक ते अर्ज घ्यावेत आणि त्याची ऑनलाईन प्रक्रिया पार पाडावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
दुष्काळी स्थितीत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, सरकार योजनांचे नाव बदलण्यापलीकडे फारसे काही करीत नाही, असे म्हणत चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असे योजनेला नाव कसे देता येईल. आमच्याही काळात योजनांना नेत्यांची नावे दिली गेली. मात्र, त्यामागे विशेषणे जोडली गेली नाहीत. अशा पद्धतीने नावे देऊन काय उपयोग होणार? केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू रुरल अर्बन मिशन बंद केले. केवळ नेहरू यांचे नाव आहे म्हणून योजना बंद करणे कितपत योग्य आहे? या योजनेतून एकेका शहराला दोन हजार कोटी रुपयांपर्यंतची मदत झाली होती. आता स्मार्ट सिटीच्या नावाने केवळ २०० कोटी रुपये दिले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी काहीही केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करतानाही दिलेली माहिती चुकविली जात आहे. अजूनही दुष्काळी मदत मिळाली नाही. सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर टीका केली. महात्मा फुले जलसंधारण योजनेला जलस्वराज्य असे नाव देऊन त्याची टिमकी वाजविली जात आहे. दुष्काळी भागात दौरा केल्यानंतर लोक तक्रारींचा पाढा वाचत आहेत. मात्र, सरकार काही करीत नाही, असे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याविरोधात सरकार राजकीय सूड उगवत असल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपण त्यांच्या पाठीशी आहोत, असे सांगायला हवे, असेही ते म्हणाले.
तत्कालीन रोजगार हमी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही भाषण झाले. या योजनेतून महाराष्ट्रात १० लाख हेक्टरावर फलोत्पादन केल्याचे सांगत हे सरकार आल्यापासून २५ हजार हेक्टर क्षेत्रावरही लागवड झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. माणिकराव ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली. रोजगार हमी योजना आणि केंद्र सरकारची या योजनेकडे बघण्याची बदललेली भूमिका या विषयी जयदेव डोळे यांनी माहिती दिली, तर अश्विनी कुलकर्णी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोजगार हमीवर अभ्यासवर्ग घेतला. ही योजना सर्वसामान्यांसाठी अधिक लाभदायक असल्याचे निष्कर्ष विविध अभ्यासातून निघाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह काँग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
विखेंचा ‘सूर’ आणि टीका!
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा पराभव का झाला, असा सूर भाषणाच्या सुरुवातीलाच लावला. लोकांपर्यंत जायला कमी पडलो. नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद निर्माण झाले, अशी दोन वाक्ये त्यांनी उच्चारली आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, विषय दुसरीकडेच  चालला आहे! नंतर सावरून ते म्हणाले की, हे व्यासपीठ त्याचे नाही. मात्र, सद्यस्थिती वाईट आहे, असे म्हणत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.