13 August 2020

News Flash

वंचित बहुजन आघाडीला चार जागा

अशोक चव्हाण यांची अ‍ॅड. आंबेडकर यांना पुन्हा साद

प्रकाश आंबेडकर

अशोक चव्हाण यांची अ‍ॅड. आंबेडकर यांना पुन्हा साद

देशातील व राज्यातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी तसेच संविधानावर गदा येऊ नये, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांना एक लेखी पत्र दिले आहे. या लेखी पत्रासह लोकसभेच्या चार जागा देण्याचेही ठरवले आहे. आरएसएसबाबत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे, तीच भूमिका काँग्रेसची असल्याचे स्पष्ट  करत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीत सामील व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत केले.

या वेळी बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, आरएसएसला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रसकडे काय आराखडा आहे, असा सवाल अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता. यासोबत काँग्रेसकडून उत्तर आल्यानंतर आमचा निर्णय जाहीर करू, असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्याला धरून खा. चव्हाण यांनी तातडीने काँग्रेसची भूमिका जाहीर केली. काँग्रेस सुरूवातीपासूनच  आरएसएसच्या विरोधात आहे. आरएसएस विरोधी वक्तव्य केल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विविध न्यायालयांत खटले सुरु असून राहुल गांधी हे आपल्या भूमिकेवर न्यायालयात ठाम असल्याचेही त्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसबाबत मसुदा स्वत तयार करावा, यावर स्वाक्षरी करण्यास तयार असल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या आहेत. वाढीव जागांसंदर्भात आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. खा. राहुल गांधीसुद्धा अ‍ॅड. आंबेडकरांची भेट घेण्यास उत्सुक आहेत.

याशिवाय इतर कोणत्याही मुद्यावर आमची चर्चा करण्याची तयारी आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीत सामील होण्याचे आवाहनही खा.चव्हाण यांनी केले. आगामी निवडणूक भाजप-सेना विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच होईल, असे वक्तव्य अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे करत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरही चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत, २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतांची आकडेवारी पाहता मतांच्या विभाजनामुळेच भाजप जिंकला आहे. ते टाळण्यासाठी महाआघाडीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच देशातील पुलवामा येथील झालेल्या दु:खद घटनेचा निषेध करत भाजप हे या घटनेवरून राजकारण करत असल्याचे सांगत शहरात भाजप नेत्यांनी लावलेल्या होर्डिंग्सबाबत नाराजी व्यक्त केली. या वेळी आ. डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर आदींची उपस्थिती होती.

महाआघाडीत समवैचारिक पक्षाला सामील करून घेतले जात असल्याचेही सांगत चव्हाण म्हणाले, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडण्याबाबत महाआघाडीत एकवाक्यता आहे. सीपीएमलाही एक जागा सोडली जाणार असून शेकाप, सीपीआय हे लोकसभेची निवडणूक लढविणार नाहीत, तरी ते काँग्रेससोबत असल्याचाही दावा त्यांनी केला. लोकतांत्रिक जनता दल, जनता दल (सेक्युलर), रिपाइं (गवई गट) यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2019 1:16 am

Web Title: ashok chavan help prakash ambedkar
Next Stories
1 ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या विभागीय अंतिम फेरीत नऊ स्पर्धक
2 सिल्लोड पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व
3 विमान प्राधिकरणात नोकरीचे आमिष, टोळी अटकेत
Just Now!
X