१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अशोक चव्हाण यांचा केलेला पराभव नांदेडातच नव्हे, तर राज्यात लक्षवेधी ठरला. राजकीयदृष्टय़ा नवख्या उमेदवाराने तरुण, पण प्रबळ उमेदवाराला हरवून केलेला चमत्कार दीर्घकाळ चच्रेत राहिला. त्या वेळी पडद्याआड घडलेल्या काही बाबींची माहिती तब्बल २६ वर्षांनी त्यातील साक्षीदाराने आता उघड केली आहे..!
वयाच्या तिशीत लोकसभेत पाऊल टाकणारे अशोक चव्हाण आज साठीच्या उंबरठय़ावर पुन्हा खासदार झाले आहेत. मागील काही निवडणुकांत आपल्या विरोधातील उमेदवार कच्चा, दुबळा असावा, या दृष्टीने त्यांनी केलेले राजकीय व्यवस्थापन त्या-त्या वेळी चच्रेत राहिले. असेच व्यवस्थापन १९८९ च्या लोकसभा निवडणुकीतही केले होते. त्या वेळच्या जनता दलाने नांदेडमध्ये डॉ. काब्दे यांना उमेदवारी द्यावी, अशी गळ चव्हाण यांनीच घातली होती, असा गौप्यस्फोट आता झाला आहे. माजी आमदार तथा ज. द.चे ज्येष्ठ नेते गंगाधर पटने हे या प्रकरणातले मुख्य साक्षीदार. डॉ. काब्दे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार आज नांदेडमध्ये होत असताना, या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी लिहिल्या गौरवपर लेखात पटने यांनी वरील गौप्यस्फोट केला आहे.
१९८७ मध्ये नांदेड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून वयाच्या तिशीत लोकसभेत प्रवेश केला होता. पुढे सार्वत्रिक निवडणुकीत आपण आरामात जिंकू, असा विश्वास चव्हाण यांना वाटत होता. त्यांचे समर्थक तर त्याहून पुढे. ‘‘अब सिर्फ लीड का सवाल है..’’ अशीच त्यांची त्या वेळची भाषा. त्यातच विरोधकांतर्फे नवखा उमेदवार आल्याने निकालापूर्वीच चव्हाणांच्या विजयाचे ढोल बडविले जात असताना सुज्ञ मतदारांनी मात्र ‘चमत्कार’ घडविला.
‘त्या’ निवडणुकीतील काही घटना-प्रसंगांचा उल्लेख करून पटने यांनी आपली रणनीती यशस्वी झाल्याचा दावा लेखात केला. ‘ती’ निवडणूक पटने यांनी लढवावी, असे ज.द.च्या त्या वेळच्या नेतृत्वाचे म्हणणे होते तर स्थानिक पातळीवर पटने यांच्यापेक्षा डॉ. काब्दे सोपे असे काँग्रेसजनांना वाटत होते. त्या वेळी अशोक चव्हाण यांच्याशी नेमके काय बोलणे झाले, तेही पटने यांनी लिहिले असून काब्दे यांनाच उमेदवारी देण्याची विनंती अशोक चव्हाण यांनी केली होती, असा दावा त्यांनी केला आहे.
शरद पवार त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ‘गंगाधर नांदेडमध्ये काय चमत्कार केलास..’ अशी विचारणा करून माझे व काब्दे यांचे अभिनंदन केल्याचे पटने यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांचा ‘तो’ पराभव अनपेक्षितच नव्हे तर धक्कादायक ठरला. त्या वेळी व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. घरगुती गॅस, दुचाकी वाहने आदींचे वितरकपद त्यांनी मिळवले होते. त्यावरून त्यांच्यावर ‘खासदार का, एजन्सीदार’ अशी टीका झाली होती. डॉ. काब्दे यांनी त्यांना ‘एजन्सीदार’ बनविल्यानंतर राजकीय पुनर्वसनासाठी चव्हाण यांना तीन वष्रे प्रतीक्षा करावी लागली. १९९२ मध्ये ते विधान परिषदेवर आले; पण ‘खराखुरा लोकप्रतिनिधी’ होण्यासाठी त्यांना १९९९ पर्यंत थांबावे लागले. त्यानंतरची एकही निवडणूक चव्हाण हरले नाहीत आणि १९८९ च्या एकमेव विजयानंतर काब्देही कधी जिंकले नाहीत..!

Sanjay Mandlik criticism of Sharad Pawar election statement Kolhapur
शरद पवार यांनी ‘तेव्हासारखे’ वक्तव्य करावे; निवडणूक आणखी सोपी होईल: संजय मंडलिक
मोहिते-पाटीलविरोधक उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
arun dudwadkar
कोल्हापूरातील दोन्ही मतदारसंघ ठाकरे सेनेकडे; अरुण दुधवडकर यांच्या दाव्याने संभ्रम
Jharkhand mp geeta kora
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का; झारखंडमधील एकमेव खासदार गीता कोरा यांचा भाजपात प्रवेश, कारण काय?