अशोक चव्हाण यांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात पुरेसे संख्याबळ नाही, ही वस्तुस्थिती असली तरी मदतीचे काही हात पुढे येतील, असा दावा करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, ही भूमिका असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीने पुढील निर्णय घ्यायचे आहेत, असे सांगितले.

वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे, अशी टीका केली होती. त्याबाबत माफी मागितली पाहिजे, असे म्हणत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससाठी केवळ ४० जागा दिल्या जातील, असे म्हटले होते. त्यांचे हे वक्तव्य अवमानकारक नाही का, असे विचारले असता थोरात यांनी वंचित बहुजनबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मात्र, अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आमच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. निवडणुकीच्या रिंगणात विरोधी उमेदवाराची तारीफ करणे अपेक्षित असते काय, असा उलट सवाल केला. शेवटी आघाडीबरोबर यायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.

 इंदापूरच्या जागेवर काँग्रेसचा दावा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. इंदापूरच्या जागेवर काँग्रेसनेही दावा सांगितला असल्याचे थोरात यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. काँग्रेस संघटनेत राज्यस्तरावर मोठे बदल होणार नाहीत. मात्र, काही दुरुस्त्या कराव्या लागल्या तर त्या मिळून केल्या जातील, असेही थोरात म्हणाले.

मराठवाडय़ातील उद्योगाला घसरण

औरंगाबादचा विकास ऑटोमोबाईल क्षेत्रावर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून मागणी घटली आहे. चारचाकी गाडय़ांच्या मागण्यांमध्ये २५ टक्के, दुचाकी गाडय़ांमध्ये १५ टक्के घट झाली असल्याने काही कंपन्यांनी कामगारांना कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. दुसरीकडे दुष्काळ आहे अशा स्थितीत यात्रा निघताहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.