एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बुधवारी छत्तीसगडमधून म्होरक्यासह टोळीच्या मुसक्या आवळल्या. मुख्य आरोपी शैलेंद्रसिंग घिसाराम (दिल्ली), विनोदसिंग गजेंसिंग, पालराम गंजेसिंग (दोघे रा. लोहारी,  हरियाणा) आणि राजेश सतबिरसिंग (रा. सुलेमाननगर, दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीने देशभरात वेगवेगळ्या राज्यात १०० हून अधिक गुन्हे केले असून या फसवणुकीतून ५० लाख रुपये हाडपल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद येथील सुधाकर रंगनाथ म्हस्के ८ सप्टेंबरला वैजापूरमधील एका एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एका अज्ञाताने पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड घेतले. यावेळी या इसमाने एटीएम कार्डची अदलाबदल केली. तीन दिवसानंतर म्हस्के पुन्हा पैसे काढण्यासाठी एटीमवर गेल्यावर त्यांना एटीएमची अदालबदल झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या खात्यातून ७७ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचेही समोर आलं. याप्रकरणी त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग आणि सायबर क्राईम सेलने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी एटीएममधील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली. दरम्यान ही टोळी छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये मध्यरात्री येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी टोळीला सापळा रचून अटक केली. आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड्स हस्तगत केली आहेत.