आयसिस या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून नासेर चाऊस या आरोपीस अटक झाल्यानंतर चौदा वर्षांपूर्वी घडलेल्या ख्वाजा युनूस प्रकरणाची परभणीकरांची आठवण ताजी झाली. घाटकोपर बॉम्बस्फोटात संशयित आरोपी म्हणून ख्वाजा युनूस याला पोलिसांनी अटक केली होती. ख्वाजा याचा पोलिसांनी पोलीस कोठडीत मारहाण केल्यानंतर मृत्यू झाला होता. मात्र, ही बाब झाकण्यासाठी औरंगाबाद येथे नेत असताना तो बेडय़ा तोडून गाडीतून पळून गेल्याचा बनाव पोलिसांनी केला होता. हे प्रकरण त्यावेळी देशभर गाजले होते.

दोन दिवसांपूर्वी अटक झालेला नासेर हा अभियंता होता. ख्वाजा युनूस हाही सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी म्हणून २७ वर्षीय ख्वाजा युनूस यास अटक करण्यात आली होती. ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर आईने सादर केलेल्या याचिकेवर पुढे राज्य सरकारने २० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. विशेष म्हणजे ख्वाजा युनूस बेपत्ता होण्यास जबाबदार असणाऱ्या पोलिसांकडून केवळ हीच रक्कम नव्हे तर या प्रकरणाच्या खटल्यासाठी तसेच तपासासाठी आलेला सर्व खर्च व्याजासह वसूल करावा, अशी सूचनाही त्यावेळी खंडपीठाने केली होती. अंबादास पोटे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरिक्षक जोशी, प्रफुल्ल भोसले, हेमंत देसाई, राजाराम व्हनमाने, अशोक सुरगंडा आदी पोलिसांचा युनूस प्रकरणाशी संबंध होता.

खर्चाचे पसे वसूल करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची मोकळीक सरकारला आहे, असे निर्देशही त्यावेळी उच्च न्यायालयाने दिले होते. घाटकोपर येथील स्फोटाच्या प्रकरणात ख्वाजा युनूस यास डिसेंबर २००२ मध्ये पोलिसांनी अटक केली होती.