गंगापूर- वैजापूर रस्त्यावरील भगूर फाट्यावर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर रॉडने हल्ला करून चोरट्याने त्यांच्या जवळील दीड लाख रुपयांची रोकड असलेली पैशाची बॅग पळवली. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनमुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

खोतेश्‍वर भालेराव हे फायनान्स प्रतिनिधी म्हणून काम करतात. ते आज गंगापूर तालुक्यातील सिंगी पिप्री येथे बचत गटाला दिलेले पैसे वसूल करण्यासाठी गेले होते. दीड लाख रूपये वसूल करून वैजापूर येथील त्यांच्या शाखेत भरण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते भगूर फाटा येथे येताच त्यांच्या पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांना धावत्या गाडीवर रॉड मारला. यात त्यांची शुद्ध हरपली. चोरट्यांनी भालेराव यांच्याजवळ असलेली पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालया अंतर्गत असलेल्या वीरगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचत आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमी भालेराव यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.