’ रेमडेसिविरचा केवळ एक दिवसाचा साठा ’ जालन्याकडून इंजेक्शन मिळण्याची शक्यता

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील प्राणवायू पुरवठा सुरळीत राहावा आणि मागणी केल्याप्रमाणे प्राणवायू वापराचे लेखापरीक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याने प्राणवायू गळती रोखण्यासाठी चमू कामाला लागले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिकेतील डॉक्टरही खासगी रुग्णालयातील प्राणवायू गळती तपासत आहेत. त्यामुळे मूळ मागणी आणि प्रत्यक्षातील वापर यातील तफावत गुरुवापर्यंत समोर येईल असे सांगण्यात येत आहे. औरंगाबााद शहराला सध्या ६७ केएल प्राणवायू पुरवठा लागतो आहे. पण एखादा दिवस जरी टँकरच्या वाहतुकीमध्ये ढिलाई झाली तर परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे प्रशासन अधिक बारकाईने पुरवठय़ावर लक्ष ठेवून आहे. शहरात आजच्या दिवस पुरेल एवढाच रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबाद शहरात मंगळवारी ८५० रेमडेसिविर इंजेक्शन होते. तो साठा एक दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे जालना येथून उद्यापर्यंत दोन हजार इंजेक्शन मिळावेत अशी मागणी नोंदविण्यात आली असून ते मिळाले तर अडचण जाणवणार नाही. अन्यथा गुरुवारी अडचण जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांचा आकडा काहीसा स्थिरावला असल्याचे चित्र दिसत असले, तरी ग्रामीण भागातील रुग्ण वाढत आहेत. गंभीर स्थितीमधील रुग्ण तालुक्याच्या ठिकाणाहून औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याने खाटा मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना कसरत करावी लागत आहे. बुधवारी दुपापर्यंत करोनामुळे २२ जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १७९४ जणांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.  घाटी रुग्णालय परिसरातील विशेषोपचार इमारतीमध्ये द्रवरूप प्राणवायूची ११ केएलची टाकी पूर्णत: तयार आहे. त्यामुळे येत्या काळात प्राणवायूच्या खाटा वाढविणे शक्य होणार आहे. पण प्राणवायू पुरवठा ही समस्या असल्याने शहरातील ५० ते ६० खासगी रुग्णालयांनी स्वत:ची प्राणवायू व्यवस्था बसवावी अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या आहेत. खासगी वैद्यकीय प्रशासनातील अधिकाऱ्यांची त्यांनी मंगळवारी बैठक घेतली. त्यात हवेतून प्राणवायू घेणारी यंत्रणा बसविण्याविषयीची कल्पना देण्यात आली आहे. प्राणवायू पुरवठय़ाबाबत सजगपणे काम केले जात असल्याचा औरंगाबाद प्रशासनाचा दावा आहे.

शहरातील रुग्णसंख्येत घट

औरंगाबाद शहरात सध्या सात हजार उपचाराधिन रुग्ण असून रुग्ण वाढ काहीशी कमी होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसापासून हा कल दिसून येत आहे. एका महिन्यातच ३२ हजार बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे बाधित होण्याचे प्रमाण ३३ टक्कय़ांवर होते. मात्र प्रशासनाने होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचा ताण कमी झाला. त्यासोबतच अंशत:  टाळेबंदी लागू करण्यात आली.  शनिवार, रविवार हे दोन दिवस कडक टाळेबंदीचे केल्याने  प्रमाण घटत असल्याची आकडेवारी आहे. ती पुढील प्रमाणे:

’१४ एप्रिल-८ हजार ६७६ ’ १५ एप्रिल-८ हजार ५७६ ’ १६ एप्रिल-८ हजार ४०३

’ १७ एप्रिल-८ हजार १५ ’ १८ एप्रिल-७ हजार ८३९  ’ १९ एप्रिल—७ हजार ४५४

’ २० एप्रिल—७ हजार १८

घाटी रुग्णालयात २८ जणांचा मृत्यू

औरंगाबाद शहरातील स्मशानभूमीत होणारे अंत्यसंस्कार आणि त्यासाठी लागणारे लाकूड याचा विचार करता येत्या काळात लाकडाचा लगदा या कामी वापरता येईल काय याची चाचपणी महापालिकेकडून केली जात आहे. दरम्यान दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. अंगावर दुखणे काढण्याच्या वृत्तीमुळे गंभीर स्थितीमध्ये रुग्ण घाटीमध्ये दाखल होतो. बुधवारी सायंकाळपर्यंत घाटी रुग्णालयात २८ जणांचा मृत्यू झाला आहे.