शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘मातोश्री’वर प्रवेश

औरंगाबाद : भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी व गजानन बारवाल यांनी बुधवारी शिवजयंतीचा मुहूर्त साधत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे आणखीही काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपला हा धक्का मानला जात आहे. तनवाणी व बारवाल यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आदी उपस्थित होते.

भाजपमध्ये अलिकडेच शहर जिल्हाध्यक्षपदावर संजय केनेकर यांची नियुक्ती झाली आहे. याच पदावर कार्यरत किशनचंद तनवाणी यांना फेरनियुक्ती मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांच्याऐवजी पक्षाने केनेकर यांना पसंती दिली. तेव्हापासून किशनचंद तनवाणी हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. तनवाणी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने त्यांची मागील काही दिवसांपासून भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांकडून मनधरणीही सुरू होती. तर गजानन बारवालही स्थायी समितीच्या सभापतिपदावर पुन्हा संधी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून महानगरपालिकेत ऐकायला मिळत होती. बारवाल व शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांचे नातेसंबंधही आहेत. बारवाल यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती. तेव्हाच बारवाल हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते.

या नाराजांना हेरून शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देत तनवाणी व गजानन बारवाल यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. तनवाणी व बारवाल हे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणूकही शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात लढवली होती. तेव्हा विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी किशनचंद तनवाणी यांच्यावर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. तर बारवाल यांनी शिवसेनेत अनेक वर्षे काम केलेले आहे. तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी वाद झाल्यानंतर बारवाल यांनी शिवसेना सोडली होती.

अनेक जण सेनेत परतण्यास उत्सुक

भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करण्यास अनेक जण इच्छुक असल्याची माहिती शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. भाजपचे काही नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत परतणार असल्याचे सांगितले जात आहे.