औरंगबाद :  करोनाकाळात चाचणी पथकांची सोय म्हणून बस वापरल्यामुळे त्याचा योग्य उपयोग करण्यात यश आल्यानंतर आता नव्याने ५ नोव्हेंबरपासून शहर बस सेवा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

औरंगाबाद शहर अधिक ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी रस्ते, पाणी, शिक्षण वाहतूक आदी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या शहरातील करोना रुग्णाचे प्रमाण कमी होत आहे. येत्या ५ नोव्हेंबर पासून स्मार्ट बस सुरू केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून बससाठी निधी देण्यात आल्याने औरंगाबादमधील शहर बस सेवेला स्मार्ट बस सेवा असे म्हटले जाते. करोनाकाळात सुरू केलेल्या उपचार सुविधा सुरू ठेवाव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या असून मेल्ट्रॉन रुग्णालय महापालिकेकडेच राहील, असे सांगत विविध योजनांची कामे वेगात करावीत असेही सुभाष देसाई यांनी सांगितले. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निधीचा योग्य विनियोग होत असून मनपातर्फे कचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे.

कचरा डेपेात कचरा प्रक्रिया केंद्राचीही कामे सुरू आहेत. शहरात १ नोव्हेंबर ते दिवाळीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. संत एकनाथ रंगमंदिर नाटय़गृहाचे काम येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल तर संत तुकाराम नाटय़गृहाचे काम दुरुस्तीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच शहरातील हॉटेल अमरप्रीत चौक येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच अन्य महापुरुषांच्या पुतळ्याचा कामाचा आढावाही पालकमंत्री देसाई यांच्यासमोर सादर करण्यात आला.  बस सेवा सुरू करताना त्यात नवी कार्यपद्धतीही स्वीकारण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यासमोर स्पष्ट करण्यात आले.