औरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्ह्य़ात मिळून रविवारी ४३६ करोनाचे रुग्ण आढळले असून जिल्ह्य़ात आजपर्यंत ८०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५९६ महानगरपालिका स्तरावरील रुग्ण असून २०४ मृत्यू हे ग्रामीण भागातील रुग्णांचे आहेत. जिल्ह्य़ातील करोना संसर्गातून दगावलेल्या रुग्णांचा मृत्युदर २.८० एवढा आहे. तर करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७५.४९ एवढे आहे.

रविवारी सकाळच्या अहवालानुसार जिल्ह्य़ातील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या २८ हजार ५९९ एवढी असून त्यात १८ हजार २०५ ही महानगरपालिका स्तरावरील आहे, तर १० हजार ३९४ ही ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आहे. जिल्ह्य़ात रविवारी सकाळी घेतलेल्या नोंदीत ४३६ करोनाचे रुग्ण निघाले. त्यात २५१ हे महानगरपालिका स्तरावरील आहेत, तर १८५ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांच्या रविवारी सकाळी पुढे आलेल्या अहवालानुसार नांदेडमध्ये १० हजार ७१२ एकूण रुग्ण असून त्यातील ६ हजार ८०० रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. परभणीत ३ हजार ८८४ एकूण रुग्ण असून २ हजार ६२६ करोनामुक्त झाले आहेत. लातूरमध्ये एकूण रुग्ण १२ हजार २७० तर ८ हजार २७० करोनामुक्त झाले आहेत. जालन्यात ६ हजार ५९६ करोनाचे रुग्ण असून त्यातील ४ हजार ६६८ करोनामुक्त झाले आहेत. बीडमध्ये ६ हजार ४९४ करोनाचे रुग्ण असून ४ हजार २६३ करोनामुक्त झाले आहेत. हिंगोलीत २ हजार ७० रुग्ण असून एक हजार ५७५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उस्मानाबादेत ८ हजार ११६ रुग्ण असून ५ हजार ८९० करोनामुक्त झाले आहेत.