महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यात आज, गुरूवारी ३५ रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या १,३९७ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. गुरूवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये १४ महिला आणि २१ पुरुषांचा समावेश आहे.

मकसूद कॉलनी, इंदिरानगर बायजीपुरा, हुसेन कॉलनी, माणिकनगर गारखेडा, रोशनगेट, रहिमनगर परिसरातील सहा जणांचे २६ व २७ मे रोजी कोरोना आणि इतर आजाराने बळी गेले. त्यामुळे औरंगाबादमध्ये एकूण मृत्यू ६५ झाले आहेत.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी (4), रेल्वे स्टेशन परिसर (2), सिटी चौक (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), साई नगर एन सहा (1), संभाजी कॉलनी, एन सहा (2), करीम कॉलनी रोशन गेट (1) अंगुरी बाग (1), तानाजी चौक, बालाजी नगर (1), एन अकरा हडको (1), जय भवानी नगर (2), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत.

  • राम नगरात ५४ पैकी ४३ कोरोनामुक्त 

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या राम नगरात प्रशासनाने मोठ्याप्रमाणात केलेल्या जनजागृतीने या भागातील कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग मंदावल्याचे सहायक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले. शिवाय या भागातील 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. यामध्ये या परिसरातील 191 व्यक्ती या 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आढळलेल्या आहेत. त्यांच्यावर विशेष लक्ष प्रशासनामार्फत ठेवण्यात येते आहे. त्यांच्यापैकी एखाद्यास कोरोनाची लक्षणे आढळली, की तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून संभाव्य धोका टाळण्यासाठीची सर्व पावले उचलल्याचेही ते म्हणाले.

सुरूवातीपासून आतापर्यंत 58 कोरोनाबाधित या परिसरात आढळले. त्यापैकी 43 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. एका जणाचा मृत्यू झाला तर उर्वरीत 14 जणांवर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून खूप मोठ्याप्रमाणात जनजागृतीसह सामाजिक कार्य या भागात होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.