खुनाच्या आरोपाखाली कोठडीत असलेला कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याला पोलिसांनी आज औरंगबाद जिल्हा सत्र न्यायालयात आणले. यावेळी अज्ञात गटाने त्याच्यावर तुफान दगडफेक केली. जमावाने केलेल्या दगडफेकीत तीन जण जखमी झाले आहेत. अचानक दगडफेक व्हायला लागल्याने न्यायालयात भर गर्दीच्या वेळी एकच धावाधाव झाली. विशेष म्हणजे ही सर्व घटना उपस्थितांच्या कॅमेरात कैद झाली आहे.

सुपारी किलर अशी ओळख असलेला कुख्यात आरोपी इम्रान मेहंदीवर अनेक नागरिकांच्या हत्येचा आरोप आहे. नगरसेवक सलीम कुरेशी हत्याकांडमध्येही मेहंदी प्रमुख आरोपी होता. कोठडीत असलेल्या मेहंदीला याच प्रकरणात आज न्यायालयात आणले. मात्र त्यापूर्वीच कुरेशी गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात न्यायालयात आले होते. मेहंदीला पाहताच त्यामधील काही जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून वाद उफाळला आणि काही क्षणात याठिकाणी दगडफेक सुरु झाली. दगडफेकीत 3 जण जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांची अधिक कुमक न्यायालयात मागविण्यात आली. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून नेमकी कोणावर कारवाई करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकली नाही.