औरंगाबादमधील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला असून या प्रकरणी  श्रीरामे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीएससीच्या परीक्षेत मार्गदर्शन करतो, असे सांगत श्रीरामे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीवरच बलात्कार केल्याचा आरोप असून या घटनेने औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणीची चार महिन्यांपूर्वी पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याशी ओळख झाली होती. पीडित तरुणी ही पोलीस कर्मचाऱ्याचीच मुलगी आहे. श्रीरामे यांनी पीडित तरुणीला एमपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो आणि पोलीस खात्यात नोकरीस लावून देतो, असे सांगत तरुणीशी ओळख वाढवली. यानंतर श्रीरामे यांनी प्रोझोन मॉलजवळील घरात पीडित तरुणीवर बलात्कार केला. श्रीरामे यांनी चार ते पाच वेळा माझ्यावर बलात्कार केला, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

नोकरी मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही दिली, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने शेवटी तरुणीने व्हॉट्स अॅपद्वारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अखेर या तक्रारीची दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री श्रीरामे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.