औरंगाबाद शहरातील हडको भागात वाळूच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह आढळला. वाळूचा अवैध साठा तिथे करण्यात आला होता. याप्रकरणी सिडको पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

शहरातील हडको एन- १२ येथील राष्ट्रवादी भवन शेजारील जागेत शेख राजू यांनी हा वाळू साठा केला होता. आज सकाळी शेख यांचे मजूर वाळूच्या ढिगाऱ्यावर वाळू नेण्यासाठी आले. यावेळी फावड्याने वाळू काढत असताना त्यांना त्यात एक मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी तत्काळ याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी येथे पाठवण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. मृतदेहाची ओळख पटली असून मृताचे नाव समाधान किसन मस्के असे आहे. सिडको एन-११ येथील ते रहिवाशी आहेत. मृतदेहाची तपासणी केली असता खिशामध्ये आधार कार्ड मिळाले त्यावरुन मृतदेहाची ओळख पटली.

मृत म्हस्के तीन आठवड्यापासून कामाच्या शोधात होते. त्यांची दुचाकी परिसरात आढळल्याने काही तरुणांनी ती त्यांच्या घरी आणून दिली होती. आज त्यांचा मृतदेह वाळूच्या ढिगाऱ्यात सापडला. मृतदेहाच्या डोक्यावरती गंभीर जखम होती. शिवाय वाळूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त पडलेले होते. फॉरेन्सिकच्या पथकाने घटनास्थळावरुन रक्‍त, वाळू व मातीचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवून दिले आहेत. सिडको पोलिस ठाण्यात सध्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मागे घातपात असावा असा प्राथमिक अंदाज असून त्यासंदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.