News Flash

सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल

हरिभाऊ बागडे पराभूत; औरंगाबाद जिल्हा बँक

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेना मंत्र्यांसह स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला आहे. मात्र, याच पॅनलमध्ये सहभागी झालेल्या माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे मात्र पराभूत झाले. सहकारात सत्ताधाऱ्यांचा झेंडा अधिक उंच होतो, हे या निवडणुकीतही दिसून आले.

गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेचा कारभार काँग्रेसचे दिवंगत नेते सुरेश पाटील पाहत असत. त्यांना सर्वपक्षीय नेत्यांची साथ असे. त्यामुळे जिल्हा बँकेचा कारभार मराठवाड्यातील इतर बँकेच्या तुलनेत अधिक चांगला होता. त्यामुळे सुरेश पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नितीन पाटील यांना सहकार्य आणि मदत मिळावी म्हणून हरिभाऊ बागडे यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे मंत्री संदिपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण यांना बरोबर घेत मोट बांधली. जिल्हा बँकेत एकहाती वर्चस्व मिळावे म्हणून राज्यमंत्री सत्तार यांनी पहिल्या टप्प्यात हात-पाय हलवून पाहिले. मात्र, इतर नेत्यांच्या सहकार्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे लक्षात आल्यानंतर शेतकरी विकास पॅनलमध्ये शिवसेनेचे नेते सहभागी झाले. दोन मंत्री आणि आमदार अंबादास दानवे शेतकरी विकास पॅनलमध्ये आल्यामुळे बाजू अधिक मजबूत दिसू लागली. या पॅनलला आव्हान देणारे पॅनल काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी उभे केले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर समर्थक उमेदवारांना त्यांनी हाताशी धरले. असे करताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना बरोबर घेण्याचे कौशल्यही कल्याण काळे यांनी साधले.

मतदानाच्या दोन दिवसाआधी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘महाविकास आघाडी’चा मुद्दा जिल्हा बँकेच्या राजकारणात कसा आणला गेला नाही हे विस्ताराने सांगितले. सरकारला त्रास देणाऱ्या भाजपच्या नेत्यांबरोबर शिवसेना मंत्री कसे गेले, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यावर टीका केली. असे करताना हरिभाऊ बागडे हे टीकेच्या केंद्रस्थानी राहतील, अशी रचना केली गेली. या राजकीय पाश्र्वाभूमीला फुलंब्री मतदारसंघातील राजकारणाचीही किनार होती. हरिभाऊ बागडे आणि कल्याण काळे हे फुलंब्री मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवतात. यावेळी दुसऱ्यांदा हरिभाऊ बागडे यांनी कल्याण काळे यांचा पराभव केला होता. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात हरिभाऊ सोडून बाकी सगळे अशी व्यवस्था असायला हवी, असे कल्याण काळे आणि त्यांच्या समर्थकांचे प्रयत्न होते. त्याला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानापूर्वी सत्ताधारी गटाने आतून पाठिंबा दिला आणि हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला. आता औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व असेल. म्हणजे शिवसेना मंत्री संदिपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नितीन पाटील, अंबादास दानवे यांचे वर्चस्व असणार आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नितीन पाटील यांचे नाव अग्रभागी ठेवण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाईल. अध्यक्षपदी नितीन पाटील आल्यानंतर पूर्वीच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये त्यांना अडकवून ते अपात्र होतील, अशी व्यूहरचना केली जाईल आणि शिवसेना नेते जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न करतील, असा आरोप निवडणुकीपूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी केला होता.

निवडणुकीदरम्यान पैशांचा अतिरिक्त वापर झाल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी आता कुजबुजला जात आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या पॅनलमधूनच आमदार सतीश चव्हाण हेही निवडून आले आहेत. यापूर्वी किरण पाटील डोणगावकर आणि मंत्री संदिपान भूमरे हे दोघे बिनविरोध निवडून आले होते. चुरशीच्या मतदानानंतर बिगरशेती मतदारसंघातून जगन्नाथ काळे, आमदार सतीश चव्हाण, नितीन पाटील, अभिषेक जयस्वाल आणि अंबादास दानवे हे पाच संचालक निवडून आले. भाजपच्या उमेदवाराला दूर ठेवत सत्ताधारी गटाने केलेल्या राजकारणाचा परिपाक म्हणून हरिभाऊ बागडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचा कल्याण काळे गटामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. ‘गड आला पण सिंह गेला’ अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे व्यक्त करत हरिभाऊंच्या पराभवाचे शल्य असल्याचे जाहीरपणे सांगितले असले तरी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात विशेष प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते.

बीडमध्ये धनंजय मुंडे यांना यश

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीप्रणीत शेतकरी विकास पॅनलने जिल्हा बँक निवडणुकीत आठपैकी पाच जागा मोठ्या फरकाने जिंकून बँकेत सत्ता परिवर्तनाचा झेंडा फडकावला. ऐनवेळी निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली असून अपक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. २० वर्षापासून भाजप नेत्यांकडे असणारी सत्ता आता धनंजय यांच्याकडे आली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी २० वर्षापूर्वी जिल्हा बँक काँग्रेस अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत आपल्या ताब्यात घेतली होती. सहकारात राजकारण नको असे सांगत सर्व पक्षातील नेत्यांना एकत्र करून त्यांनी २० वर्षे आपले वर्चस्व कायम ठेवले. पाच वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांनीही संचालक मंडळाच्या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवले होते. या वेळी मात्र निवडणुकीपूर्वी एक दिवस अगोदर बहिष्कार टाकून भाजपने सपशेल माघार घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 12:17 am

Web Title: aurangabad district bank election haribhau bagade defeated ab n 97
Next Stories
1 शिवसेना उपतालुकाप्रमुखाची आत्महत्या; ठाण्यात जमाव
2 … एका वाघाची भ्रमणगाथा
3 लसीकरणाची गती संथच
Just Now!
X