27 February 2021

News Flash

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची सभा तहकूब

मावळत्या अध्यक्षांची बंडखोरी, शिवसेनेला भाजपचा धक्का, गोंधळामुळे लाठीहल्ला

मावळत्या अध्यक्षांची बंडखोरी, शिवसेनेला भाजपचा धक्का, गोंधळामुळे लाठीहल्ला

औरंगाबाद :  शिवसेनेच्या मावळत्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांनी भाजपचा पाठिंबा घेत केलेली बंडखोरी, एका सदस्याच्या मतदानावेळी झालेला स्वाक्षरीचा गोंधळ आणि भाजपच्या महिला सदस्याला मतदानाचा अधिकार नाकारल्याच्या मुद्यावरून औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सभेत शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. अखेर सभा तहकूब करावी लागली. तर सभागृहाबाहेर शिवसेना-भाजप समर्थकांमधील संघर्ष पेटला असताना पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला छावणीचे स्वरुप आले होते. गोंधळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून सभा तहकूब झाली. उद्या मतदान नव्याने घेतले जाणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत दुपारी दोनच्या सुमारास निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून मीना शेळके, भाजपकडून अनुराधा चव्हाण यांनी अर्ज भरले. ऐनवेळी भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी अर्ज मागे घेत अपक्ष अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांना पािठबा दर्शवला. शिवाय जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या २३ सदस्यांच्या पािठब्यावर शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी पक्षाच्या विरोधात जात अपक्ष अर्ज दाखल केल्याने शिवसेनेत संताप पसरला होता. शिवसेनेचे सहा सदस्यही फुटण्याच्या तयारीत असल्याच्या चच्रेनंतर आमदार अंबादास दानवे हेही जिल्हा परिषदेत दाखल झाले. तर भाजपने पािठबा दिलेल्या उमेदवार अ‍ॅड. डोणगावकर यांना २९ मते पडली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी, काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या मीना शेळके यांना २८ मते पडल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी राज्यमंत्री आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड, मकरिये आदी जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांनी आमच्या सदस्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सभागृहात जाण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले.

यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कराड यांनी सांगितले की, शिवसेना-काँग्रेसच्या महाविकास आघाडीतील दहा सदस्यांचा बंडखोर गट भाजपसोबत आला आहे. आमचे २३ सदस्य आहेत. बंडखोर दहा आहेत. हे संख्याबळ पाहता आमचे बहुमत असून अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून घोषित करावे.

सभागृहात उडालेल्या गोंधळानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली. आता यावर उद्या निर्णय होईल, असे जाहीर केले. यानंतर प्रत्येक सदस्याला पोलीस बंदोबस्तात त्यांच्या वाहनामध्ये बसवण्यात येत असताना एकाने बंडखोर अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांच्या वाहनावर मारलेल्या थापेवरून जिल्हा परिषदेत गोंधळ उडाला.

भाजप व शिवसेनेच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला. शिवसेनेकडून आमदार अंबादास दानवे हे एकटेच जिल्हा परिषदेत किल्ला लढवत होते.

मतदान प्रक्रिया आज नव्याने

मतदान प्रक्रियेमध्ये एका उमदेवाराने प्रथम हात उंचावला. मात्र, स्वाक्षरी केली नाही. हा सर्व प्रकार व्हिडीओ कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. दरम्यानच्या काळात सभागृहात गोंधळ सुरू झाल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. गोंधळामुळे प्रशासनाला कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळाले याची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी नव्याने मतदान प्रक्रिया राबवण्यात येईल. ६१ पैकी ५८ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. तर तीन अनुपस्थित सदस्यांना उद्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येईल.

– भानुदास पालवे, पीठासीन अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 4:15 am

Web Title: aurangabad district council chairman selection meeting adjourned zws 70
Next Stories
1 अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर ६२३ कोटी रुपयांचा दंड
2 मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी लोकसत्ताचे वसंत मुंडे !
3 सासऱ्याचा जावयाला चकवा; रावसाहेब दानवेंवर हर्षवर्धन जाधव यांचे गंभीर आरोप
Just Now!
X