05 August 2020

News Flash

औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सत्तेत ‘मिळून सारे जण’

 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ४ जानेवारी रोजी मीना शेळके यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस, भाजप व शिवसेना सत्तेत

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीतही मंगळवारी नाटय़मय घडामोडी घडल्या असून प्रमुख सर्व पक्षांनी सत्तापदांवर वर्णी लावून घेतली आहे. मतदानाचा केवळ सोपस्कार पार पडला. सभापतिपदाच्या निवडीत शिवसेना-भाजपची युती झाल्याचेही चित्र स्पष्ट झाले. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे, उपाध्यक्षपदासह एक सभापतिपद भाजपला, काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या सत्तार गटाकडे एक तर तीन सभापतिपदे ही शिवसेनेच्या पारडय़ात पडली आहेत.

सभापतिपदाच्या निवडणूक प्रक्रियेला निर्णय अधिकारी बाणापुरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांनी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेच्या मोनाली राठोड यांनीही याच पदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, मोनाली राठोड यांनी महिला व बालकल्याण सभापतिपदासाठीचा अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. तर समाजकल्याण सभापतिपदासाठी मोनाली राठोड व शिवसेनेचे रमेश पवार यांचे अर्ज होते. मात्र, पवार यांना पक्षादेश आल्याने त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. परंतु आपल्यावर अन्याय झाला असून शिवसेना व भाजपची युती झाल्याचे पवार यांनी माध्यमांना सांगितले.

अन्य दोन सभापतिपदासाठी पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सदस्य व आता शिवसेनेतील सत्तार गटाचे असलेले किशोर बलांडे, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, शिवसेनेचे अविनाश गलांडे यांचे अर्ज होते. त्यात श्रीराम महाजन यांनी अर्ज मागे घेतला. किशोर बलांडे व अविनाश गलांडे यांना प्रत्येकी ६० सदस्यांचे मतदान झाले. संख्याबळानुसार कोणीही विरोधात मतदान करायचे नाही, असेच ठरल्याने दोन सभापतिपदासाठीच्या निवडणुकीचा सोपस्कार पार पडला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ४ जानेवारी रोजी मीना शेळके यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे एल. जी. गायकवाड यांचा झालेला विजय आश्चर्यचकित करणारा ठरला होता. भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने काँग्रेसच्या साथीने अध्यक्षपद पटकावून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. पुन्हा नव्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड होत असतानाच अध्यक्ष राहिलेल्या शिवसेनेच्या अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळेच भाजपकडे उपाध्यक्षपद आले. सभापतिपदाच्या निवडणुकीत मंगळवारी काय होते, याकडे लक्ष लागले होते.

जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र

राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र आल्याची प्रतिक्रिया सभापतिपदी निवडून आलेले शिवसेनेतील सत्तार गटाचे किशोर बलांडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 3:50 am

Web Title: aurangabad district council congress bjp and shiv sena in power zws 70
Next Stories
1 जिल्हा परिषदेतील सत्तापदांवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये धुसफूस
2 कृषिपंपाला वीजजोडणीत संथगती, मराठवाडय़ात ४७ हजार जोडण्या प्रलंबित
3 मतपेढीच्या राजकारणामुळे ३० नदीजोड प्रकल्प रखडले
Just Now!
X