औरंगाबाद विभागातील पाच जिल्हय़ांचा दहावीचा सरासरी निकाल ८८.०५ टक्के एवढा लागला. या वर्षी बीड जिल्हय़ाने ९३.९० टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण गाठून निकालात आघाडी घेतली आहे. सर्वात कमी निकाल परभणी जिल्हय़ाचा असून तो ७७.८० टक्के एवढा आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.७० टक्क्यांनी अधिक आहे.

औरंगाबाद जिल्हय़ात ६१ हजार ७८१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ५५ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ३५ हजार २७८ मुले तर २६ हजार ५०३ मुलींनी परीक्षा दिली होती. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.२१ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.५३ एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने हा निकाल २ टक्क्यांनी कमी लागला आहे. परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी ३३ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती, तर ५६२ बैठी पथके कार्यान्वित होते. दहावीचा निकाल कधी लागतो यावर बरेच तर्कवितर्क लढवले जात होते. सोमवारी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना इंटरनेटवर निकाल उपलब्ध झाले आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांनी आनंदोत्सव साजरा केला.