औरंगाबादमधील कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून चिखलठाणा परिसरात स्वच्छता निरीक्षकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. चिखलठाणा येथील एक जागा महापालिकेने कचरा टाकण्यासाठी निश्चित केली होती. मात्र, या जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध असून यातूनच ही मारहाणीची घटना घडल्याचे समजते.

औरंगाबादमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. बुधवारी सकाळी चिखलठाणा परिसरात कचऱ्याच्या समस्येवरुन स्थानिकांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण केली. या भागात महापालिकेने कचरा टाकण्यासाठी एक जागा निश्चित केली होती. बुधवारी सकाळी या जागेवर कचरा टाकला जात असताना स्थानिकांनी त्यास विरोध दर्शवला. संतप्त स्थानिकांनी स्वच्छता निरीक्षकास बेदम मारहाण केली.

स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले यांना जमावाने मारहाण केली असून या घटनेनंतर मनपामधील सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याची भूमिका घेतली. यासंदर्भात कामगारांची बैठक सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात बजरंग चौकातील राजपूत हॉस्पिटलजवळ बुलेटवरून घरी जाणाऱ्या चेतन चोपडे यांचा नाल्यात पडून मृत्यू झाला होता. चोपडे यांचा मृत्यू महापालिकेच्या ढिसाळ कामगारामुळे झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी पाहणीसाठी आलेले मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकावली होती.