प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राम यांची ग्वाही

औरंगाबादचा प्रश्न या पुढील दहा दिवसांत निकाली निघेल. अकराव्या दिवशी शहराचे रूप पालटलेले असेल. शहरात आजच्या परिस्थितीत रस्त्यांवर एक हजार मेट्रिक टन कचरा पडलेला असून, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विभागनिहाय मनपाचे अधिकारी, कर्मचारी, निरीक्षक यांचा चमू काम करणार आहे. कामात दिरंगाई करणाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, असा इशारा देतानाच मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, नगरसेवक हे जनतेतून निवडून येत असल्याने आणि त्यांचा त्यांच्याशी थेट संपर्क पाहता नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही सोमवारी केले.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला दुपारी १२च्या सुमारास सुरुवात झाली. महापौर नंदकुमार घोडेल, उपमहापौर औताडे, आयुक्तपदाचा पदभार घेतलेले जिल्हाधिकारी राम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी औरंगाबादचे माजी पालकमंत्री  पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्याचा शोकप्रस्ताव ठेवला. कदम यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर शहराचा मुख्य प्रश्न बनलेल्या कचरा समस्येचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कचऱ्याची विविध भागांतील समस्या, मिटमिटा भागातील गट नंबर ५४ मध्येच कचरा का टाकला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून साहेबराव आमले यांनी नुकतेच बदली झालेले मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर व सिकंदर अली यांच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. कारण मिटमिटा भागात वाहनांमधील कचरा हा मनपाचे अधिकारी व कर्मचारीच पेटवून देत असल्याची काही छायाचित्रे महापौरांकडे सादर करण्यात आली. कचऱ्याचा प्रश्न केवळ प्रशासनावरच ढकलून चालणार नसून नगरसेवकांनीही पुढे यावे, अशी मागणी राजगौरव वानखेडे यांनी केली. इतर नगरसेवकांनीही हा प्रश्न मांडला. नगरसेविका अदवंत यांनी प्लास्टिक बंदीची सुरुवात मनपातूनच व्हावी, असा मुद्दा मांडला. रमानगरमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया सुरू असून त्यातून कुठलाही धोका नसल्याचे सभेत सांगण्यात आले.

कचऱ्यावर निवेदन करताना जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, शहराची आपण पाहणी केली असून मनपाच्या मालकीच्या ज्या १०२ जागा आहेत त्याचा विचार केला जात आहे. त्या ठिकाणी कचरा टाकून तेथेच कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया सुरू केली जाईल. नागरिकांकडून विरोध होत असेल तर त्यांना माजी महापौर भगवान घडामोडे व एका आमदाराच्या घराजवळच कचरा साठवून त्यातून खत निर्मिती होत असल्याचे उदाहरण नगरसेवकांनी सांगावे, असे आवाहनही करताना राम पुढे म्हणाले, कचऱ्यामुळे कुठल्याही प्रकारचे पाणी दूषित वगैरे होत नाही. पावसाळ्यातही कचऱ्यापासून धोका निर्माण होऊ नये, यासाठी शेड, संरक्षक भिंत जूनपूर्वी उभारण्यात येणार आहेत. एक एकर जागेत ८० टन कचरा साठवला तर त्यातून ४५ दिवसात खत निर्मिती होते. बायो मिथेनगॅसचा प्रकल्पही होणार असून त्याठी ८६ कोटींचा एक प्रकल्प आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये २० कोटी राज्याचे तर ३५ कोटी केंद्र सरकारचे राहणार आहेत. नारेगावातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५० कोटी लागणार आहेत. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी नाशिकच्या कुंभमेळ्यात काम पाहिलेल्या एका एजन्सीबरोबरही बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

दहा हजार कचरापेटय़ांची खरेदी

कचरा व्यवस्थापनासाठी रिक्षा, यंत्र व १० हजार कचरापेटय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून निधीही प्राप्त झालेले असतानाही कार्यवाही होत नाही, असा प्रश्न विचारात महापौर नंदकुमार घोडेले यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला खडसावले. कचऱ्याची दरुगधी रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व रासायनिक पावडर, औषधे खरेदी करण्याचेही आदेश महापौरांनी दिले.