करोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी ३८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंतची करोनाबाधितांची संख्या १ हजार ४०० वर गेली आहे. मात्र, ज्या वस्त्यांमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण अधिक असे त्यावर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश येत आहे. रामनगर भागात ५४ करोनाबाधितांपैकी ४३ क रोनाबाधित  रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. शहरातील  २३ वसाहतीमधील रुग्णसंख्या आता शुन्यावर आली आहे. रेल्वे स्थानकाजवळील हमालवाडी परिसरात गुरुवारी सर्वाधिक चार रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय २४ वसाहतीमध्ये एक व दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच नारळीबाग या भागातही तीन रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या नव्या भागात वाढत असली तरी त्याचा वेग कमी झाला आहे. करोनामुक्त होण्याचे प्रमाणही आता वाढत आहे.

शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरात अजूनही रुग्ण सापडत आहेत. बायजीपुरा, मिसारवाडी, संजयनगर, वाळूज महानगर, शहागंज, हुसेन कॉलनी, कैलासनगर, रोकडिया हुनुमान, उस्मानपुरा, इटखेडा, एन-४, नाथनगर, बालाजीनगर, साईनगर एन-६, करीम कॉलनी रोशनगेट, अंगुरी बाग, तानाजी चौक बालाजीनगर, या भागात रुग्ण आढळून आले. शहरातील १६० वसाहतींमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे.

दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात ५० पेक्षा अधिक व्यक्तींचे आजाराबाबतचे सर्वेक्षण करून झाले आहे. आरेफ कॉलनी, सिडको एन वन, सातारा येथील सह्यद्रीनगर, श्रीनिवास कॉलनी, कासलीवाल तारांगण मीटमिटा, पद्मपुरा, अहबाब कॉलनी, बायजीपुरा येथील गल्ली क्रमांक २१ यासह विविध वस्त्यांचा करोना रुग्णांचा आकडा शुन्यावर गेला आहे.