औरंगाबादमधील जवाहरनगर येथील माणिक हॉस्पिटलला लागलेल्या आगीत सलमान पटेल हा रुग्णांसाठी देवदूत ठरला. आगीत अडकलेल्या ३३ जणांची सलमानने सुटका केली. सलमानने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

जवाहरनगर परिसरातील माणिक हॉस्पिटलला सोमवारी सकाळी आग लागली. आगीमुळे मजल्यावर रुग्ण अडकले होते. धुराचा त्रास होऊ लागल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ सुरु झाली. सलमान पटेल यांचे हॉस्पिटल शेजारी सेक्युरिटी गार्डचं ऑफिस आहे. दुकानात बसलेले असताना त्यांना रुग्णालयातून धूर येताना दिसला. ते बाहेर आले असता त्यांना कर्मचारी रुग्णालयाबाहेर पळत असल्याचे दिसले. मदतीसाठी सलमान आणि त्यांचे वडील नवाब पटेल दोघे हॉस्पिटलच्या दिशेने पळाले. त्यांनी खिडक्याच्या काचा तोडल्या. जवळच असलेल्या पोलिसांना बोलावलं. रुग्णालयातली फायर यंत्रणा निकामी होती. त्यामुळे आग विझवता आली नाही. तोपर्यंत सलमानने स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात केली. घटनेनंतर १५ मिनिटांनी फायर ब्रिगेडचे पथक दाखल झाले. बेडशीटची झोळी करून रुग्णांना बाहेर काढण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये तळमजल्यात जिन्यावर वेल्डिंग सुरु होते. त्याची ठिणगी पडल्याने आग लागली, असे काही रुग्ण सांगत आहेत. सर्व रुग्ण इतर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्या फाईल मात्र, गहाळ झाल्या आहेत. तर, काहींच्या नातेवाईकांना दोन्ही दवाखान्यातून स्पष्टपणे काहीच सांगण्यात येत नाही. औरंगाबाद तालुक्यातील रामेश्वरवाडी येथील रामचंद डेडवाल यांना दोन दिवसांपूर्वी आसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आगीच्या घटनेनंतर रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं. मात्र त्यांना कुठं हलवण्यात आलं ही माहिती नातेवाईकांना मिळाली नाही.
१०० बेडचा दवाखाना असून त्यात ३ रुग्ण अॅडमिट होते. सलमानची सतर्कता आणि नागरिकांच्या मदतीने या सर्वांता जीव वाचला. त्यांना शहरातील हेडगेवार आणि इतर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं.