प्रदूषणाच्या सर्व कसोटय़ांमध्ये औरंगाबादमधील उद्योग जवळपास नापास झाले आहेत. हरित लवाद न्यायाधिकरणाने दिलेल्या सूचनेनुसार ३४ कंपन्यांच्या भोवताली ६ किलोमीटर परिसरातून घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यांत नाना प्रकारचे दोष आढळून आले आहेत. कंपन्यांनी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा नीट उपयोग न केल्याने रांजणगाव, शेणपुजी, जोगेश्वरी, कमलापूर या गावांमधील कूपनलिका आणि विहिरींत पाणी दूषित असल्याचे अहवाल आहेत. जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी या अहवालाच्या आधारे त्यांची निरीक्षणे न्यायालयाकडे सादर केली आहेत.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील ३४ उद्योजकांच्या कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे नमुने १९ ऑगस्टला घेण्यात आले होते. सल्फेट, क्लोराईड, पाण्याचा हार्डनेस आदी घातक पदार्थ आढळून आले आहेत. सांडपाण्यातील ऑक्सिजनचे, तरंगणाऱ्या पदार्थाचे प्रमाणही अनेक ठिकाणी आढळून आले. कोणत्या कंपनीतील पाण्याच्या नमुन्यात कोणता दोष याची यादी तयार करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यामध्येच या वेळी कमालीचे दोष दिसून आले आहेत.
प्रदूषण आणि त्याची व्याप्तीही बरीच असल्याचे रॅडिको प्रकरणावरून पुरेसे स्पष्ट झाल्यानंतरही सर्वसमावेशक तपासणीचा भाग म्हणून कारवाईचे निर्देश थेट हरित लवादास द्यावे लागले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाणी नमुने घेऊन त्याची तपासणी केली. त्यात अनेक नमुन्यांमध्ये वेगवेगळे प्रदूषण घटक आढळून आले.
-बीओडी –  सांडपाण्यातील जैविक घटकाचे विघटन होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. शहराभोवतालच्या बहुतांश कंपन्यांमध्ये ही समस्या आढळून आली.
-एसएमएस सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, वोक्हार्ड बायोटेक प्रा. लि., इंडय़ुरन्स सिस्टम प्रा. लि येथील पाणी नमुन्यांनी मर्यादा ओलांडली आहे. सांडपाण्यात हे प्रमाण शंभरपेक्षा अधिक असू नये.
-सीओडी- सांडपाण्यातील रसायनांचे विघटन करण्यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजनचे प्रमाण याची क्षमता २५० पर्यंत धोकादायक मानली जात नाही. वोक्हार्ड बायोटेक प्रा. लि., इन्डय़ूरन्स प्रा. लि., रोहित एक्झॉस्ट, अत्रा फार्मास्युटिकल्स, मिलेनियम बीअर यासह अनेक कंपन्यांमधून निघणारे पाणी प्रदूषण वाढविणारे आहे.
-केवळ सीओडी, बीओडीच नाही तर क्लोराईडसह इतरही घातक पदार्थ सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचे दिसून आले. स्कोल ब्रेव्हरीज, मिलेनियम बेव्हरीजमधील पाणी नमुन्यांत दोष आढळून आले आहेत. दूषित पाण्यावर तरंगणाऱ्या पदार्थाचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून आले.
-रांजणगाव, शेणपुजी, कमलापूर, रामराईवाडी या गावांतील कूपनलिकांमधील पाण्याचे नमूनेही प्रदूषित आहेत. केवळ पाणी नमुने नाही तर जमिनीतील प्रवाह कसे जातात, या आधारे प्रदूषणाचा अभ्यास करण्यात आला. वारंवार होणाऱ्या प्रदूषणाच्या या प्रश्नी हरित लवाद न्यायाधिकरण काय निर्णय देते, याकडे अनेकांचे लक्ष असले तरी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.