*‘हेल्लारो’ने चित्रपट महोत्सवास प्रारंभ * ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ४० चित्रपटांची मेजवानी

औरंगाबाद : जागतिक दर्जाचे चित्रपट मराठवाडय़ातील रसिकांना पाहावयास मिळावेत, रसिकता वाढीस लागावी म्हणून गेली सहा वर्षे सातत्याने औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी सातवा महोत्सव ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केला जात आहे. प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन, ‘हेल्लारो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शाह, प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, तान्हाजी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, महोत्सवाचे आर्टस्टिीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संचालक अशोक राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

मराठी, हिंदी आणि विविध देशांतील आणि भाषेतील ४० चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवात मिळणार आहे. फक्त चित्रपट पाहणे हा मुख्य भाग असला तरी चित्रपट पाहण्यासाठी निर्माण केलेली वातावरण निर्मिती आणि रसिकता वाढीस लागावी म्हणून घेतलेले उपक्रम सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांच्या सोबतीने औरंगाबाद शहरातील या महोत्सवादरम्यान चित्रपट निर्मिती आणि त्यामागची वैचारिकता यावरही चर्चासत्र होणार आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई – विभागीय केंद्र औरंगाबादच्या वतीने आयोजित या महोत्सवामुळे मराठवाडय़ातील तंत्रज्ञ आणि कलावंतांशी सुसंवाद साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. या महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा होणार असून त्यात विविध भाषेतील नऊ चित्रपटांचा समावेश आहे. पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे गोल्डन कैलासा पारितोषिक देण्यात येणार आहे.

तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचादेखील समावेश असणार आहे.

सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप  ‘पॅरासाइड’ (दक्षिण कोरिया) या चित्रपटाने होणार आहे. अंदाधुन, बदलापूर या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक श्रीराम राघवन हे संवाद साधणार असून या निमित्ताने  ‘इतिहास व सिनेमॅटिक लिबर्टी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राची ६० वर्षे आणि मराठी सिनेमा’ या विषयावर विशेष दृक्-श्राव्य व्याख्यान आयोजित केले आहे.

‘स्त्री दिग्दर्शक : जाणिवा आणि दृष्टिकोन’ या विषयावर स्त्री सिने दिग्दर्शकांसमवेत विशेष परिसंवाद आयोजित केला आहे.

या परिसंवादात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गौरी शिंदे, सुमित्रा भावे, अभिनेत्री व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी, प्रतिमा जोशी या आपले विचार व्यक्त करतील. प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे या मान्यवरांसोबत संवाद साधतील.