गारखेडा परिसरातील माणिक रुग्णालयाला सकाळी ११ च्या सुमारास आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. तळमजल्यावर विजेशी संबंधित काम सुरू होते. तेव्हाच आग लागल्याचे समजले. ही आग लागली तेव्हा तेहतीसहून अधिक रुग्ण रुग्णालयात होते. त्यांना काढण्यासाठी अग्निशामक दलाला आणि तरुणांना मोठी कसरत करावी लागली. तळमजल्यावर सुरू असणाऱ्या वेल्डिंगमुळे ठिणगी पडली आणि आग लागली. आग लागल्याचे समजताच धुरांचे मोठे लोट परिसरात दिसून आल्यानंतर आठ अग्निशामक दलाच्या गाडय़ा पाठविण्यात आल्या. काही वेळात आग आटोक्यात आली तरी रुग्णांना त्याचा मोठा त्रास झाला. कपडय़ाची झोळी करून शिडीच्या सहाय्याने रुग्णांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णवाहिकांच्या सहाय्याने त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले.

गारखेडा परिसरात डॉ. उल्हास कोंडपल्ले यांचे माणिक रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या तळमजल्यावर सामान्य रुग्णकक्ष उघडण्यात आला. वास्तविक ही जागा वाहनतळासाठी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, येथेच सिटीस्कॅन आणि विविध तपासण्यांसाठीची प्रयोगशाळाही आहे. आग लागली तेव्हा रुग्णालयातील अग्निशामक व्यवस्थेतील एकही यंत्र काम करत नव्हते. पाहता पाहता आग भडकली आणि रुग्णांना बाहेर काढण्याइतपत ती वाढली.

आगीचे वृत्त समजताच भोवताली जमलेल्या काही तरुणांनी शिडय़ा लावल्या आणि खिडक्यांमधून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी ते सरसावले. दुसऱ्या बाजूला अग्निशामक दलातील कर्मचारी आग विझवत होते.

आगीच्या घटनेची माहिती कळताच आमदार संजय शिरसाट, नगरसेवक राजू वैद्य यांसह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस सहाय्यक आयुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह पोलीस कर्मचारीही पोहोचले. रुग्णालयातील ३३ रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात हलविण्यात आले. घाटी रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचतील आणि आवश्यकता पडली तर रुग्णांना घाटी रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या.

रुग्णांना वाचविण्यासाठी नागरिक सरसावले

माणिक हॉस्पिटलच्या शेजारीच दुकान असणाऱ्या सलमान पटेल यांना रुग्णालयातून धूर येऊ लागल्याचे दिसताच ते बाहेर पडले. त्यांनी रुग्णालयाच्या खिडक्यांच्या काचा तोडल्या. जवाहरनगर पोलीस ठाणे समोरच असल्यामुळे त्यांनाही बोलावले. सलमानचे वडील नवाब पटेलही रुग्णांना वाचविण्यासाठी पुढे सरसावले. सलमान पटेल आणि त्याच्या मित्रांनी मिळून रुग्णालयातील अनेकांना बाहेर काढले. औरंगाबाद तालुक्यातील रामेश्वरवाडी येथील रामचंद्र डेडवाल यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, कोणत्या रुग्णालयात त्यांना ठेवण्यात आले आहे, याची माहिती नातेवाईकांना लवकर मिळाली नाही. सलमानची सतर्कता आणि नागरिकांच्या मदतीने अनेकांचे प्राण वाचले.