युतीमध्ये ठरल्याप्रमाणे महापौर बदलासाठी भाजप नगरसेवकांचा रेटा वाढू लागला आहे. तथापि मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर भाजपकडे उमेदवार नसल्याने शिवसेना महापौर पद सोडण्याच्या तयारीत नसल्याचे सांगितले जाते. या पदासाठी राजू शिंदे, भगवान घडामोडे यांची नावे चर्चेत होती. मनपा निवडणुकीत मनसेतून भाजपमध्ये आलेल्या राजगौरव वानखेडे यांचे नावही पुढे आणले जात आहे. महापौरपदावर आपल्या समर्थकाची वर्णी लागवी, यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्येही वर्चस्ववादाची लढाई असल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. युतीच्या करारानुसार शिवसेनेला २९ ऑक्टोबरला शिवसेनेच्या महापौरांना राजीनामा द्यावा लागणार आहे.

महापौरपदासाठी भाजपच्या काही महिला नगरसेवकांनीही दावा करण्यास सुरुवात केला आहे. भाजपमध्ये वर्चस्वाची मोठी लगबग सुरू असते. नगरसेवक राजू शिंदे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे समर्थक आहेत. भगवान घडामोडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र, मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर नगरसेवकांपैकी मराठा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसा सक्षम उमेदवार भाजपकडे नसल्याने दीड वर्षांने मिळणारे महापौरपद या वर्षी घ्यायचे की नाही, यावरूनही सध्या संभ्रम सुरू आहे. दीड वर्षांनंतर एक वष्रे महापौरपद भाजपकडे देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, याबाबतचे सर्व निर्णय वरिष्ठस्तराहून घेतले जातील, असे सांगण्यात येते. या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, की ‘हे सर्व निर्णय वरिष्ठ नेते घेतील; त्यांनी सांगितले तर राजीनामा देऊ.’ अशीच प्रतिक्रिया भाजपचे नेतेही व्यक्त करीत आहेत. मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर महापौर निवडीसाठी नावे शोधण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.